सोलापूर , ११ जानेवारी २०२२ : मानवी जीवनात निरनिराळ्या प्रजातीच्या पक्ष्यांचे अस्तित्व हाच मानव पक्षी संवादाचा मार्ग आहे, असे मत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी व्यक्त केले. ३४ व्या महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाचे उद्घाटन शनिवारी जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांच्या हस्ते झाले.
डॉ. मेतन फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक वनीकरण सोलापूर आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या सहकार्याने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात तीन दिवसीय ३४ वे महाराष्ट्र राज्य पक्षीमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संमेलनाच्या उद्घाटनावेळी व्यासपीठावर डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. निनाद शहा, महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयंत वडतकर, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. राजू कसांबे, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील, एमआयटीच्या पर्यावरण विभाग प्रमुख प्रा. स्वाती कराड, एनटीपीसीचे चीफ जनरल मॅनेजर एन. श्रीनिवास राव, किर्लोस्कर कंपनीचे फॅक्टरी मॅनेजर विलास खरात उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, माणसाने साद घातली की निसर्ग प्रतिसाद देतो. पक्षी संवर्धनासाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला पाहिजे. सोलापूर हे पक्ष्यांचे माहेरघर आहे. येथील पक्षी वैभव मोठे आहे. पक्ष्यांना पूरक परिसंस्था निर्माण केल्यास पक्षी समाजात सहजतेने वावरतील. निसर्ग कल्याणा प्रमाणेच मानव कल्याणाचाही हेतू या पक्षीमित्र संमेलनाचा आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले.
डॉ. मेतन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. व्यंकटेश मेतन यांनी प्रास्ताविक केले.
अभिज भानप यांनी सूत्रसंचालन तर पत्रकार विनोद कामतकर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी अनिल जोशी, आदी उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी