जिल्हाधिकारी शंभरकर यांचे महसूल दिनी आवाहन

सोलापूर, १ ऑगस्ट २०२० : महसूल विभाग शेती आणि शेतीशी संबंधित घटकांसोबत इतर महत्वाची कामे करत असतो. महसूल अधिकारी प्रशासनाचा कणा असून शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा आहे. यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्येचे निराकरण वेळेत होऊन लोकाभिमुख कामे करण्यावर या विभागाने भर द्यावा, असे आवाहन आज महसूल दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात केले.

कोरोनाच्या या वाढत्या महामारीत, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागृत राहून कोरोनाबाबत प्रबोधन करून गैरसमज दूर करावा. महसूल विभागातर्फे कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

कर्मचाऱ्यांच्या गृहनिर्माण संस्थेसाठी जागा देण्यासाठी प्राधान्य राहील. महाभूमी पोर्टलवर संगणकीकृत अभिलेखांपैकी फक्त सातबारा उतारा डिजिटल स्वाक्षरीने जनतेला डाऊनलोड साठी उपलब्ध होता. आता डिजिटल स्वाक्षरीत खाते उतारा ही मिळणार आहे. कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, पीक कर्ज किंवा जमीन खरेदी विक्रीसाठी सातबारा उताऱ्यासोबत खाते उतारा आवश्यक आहे. यामुळे महसूल विभागाने खाते उतारा सुद्धा तलाठी यांच्या डिजीटल स्वाक्षरीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासून ही सेवा उपलब्ध असणार आहे, याचा जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.

या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त बापू बांगर, प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी अंकित, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शिवरत्न शेटे, उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, चिटणीस श्रीकांत पाटील, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार अमोल कुंभार, महसूल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंतनू गायकवाड, जिल्हाध्यक्ष जयंत जुगदार, महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय सरचिटणीस प्रवीण शिरसीकर, तलाठी संघटनेचे सरचिटणीस विजय विजापुरे, महसूल चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत भांडेकर, कोतवाल संघटनेचे विठ्ठल गुरव, पोलीस संघटनेचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते. तसेच,या कार्यक्रमात प्रास्ताविक जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी केले. तर, सुत्रसंचालन निवृत्त तहसीलदार नागनाथ माळवदकर यांनी केले आणि संदीप लटके यांनी आभार मानले.

न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा