अमेरिका, ६ ऑक्टोबर २०२२ नासातर्फे नवनवीन प्रयोग केले जातात. नुकत्याच एका चित्रात एक महत्त्वाची आणि अजब गोष्ट समोर आली आहे. त्यात नासाच्या ‘डार्ट’ या अवकाशयानाकडून जाणूनबूजून आदळलेल्या उल्कापिंडचा ढिगारा हजारो किलोमीटरच्या वातावरणात पसरलेला दिसून आला. नासाच्या दुर्बिणीने घेतलेल्या नव्या छायाचित्रावरून ही बाब समोर आली आहे. ‘डबल अॅस्टरॉइड रीडायरेक्शन टेस्ट’ या स्पेसक्राफ्टने २६ सप्टेंबर रोजी डिमॉर्फोस नावाच्या उल्कापिंडाला जाणूनबुजून धडक दिली. हा डिडमॉस नावाच्या लघुग्रहाचा दगड होता. दरम्यान, ही पहिली ग्रह संरक्षण चाचणी होती, ज्यामध्ये अंतराळयानाच्या प्रभावाने लघुग्रहाच्या कक्षा बदलण्याचा प्रयत्न केला. त्याच्या छायाचित्रांवर आजपासून अभ्यास सुरु करण्यात आला.
हे करण्याचा नासाच्या प्रयत्नामुळे नासाचे एक पाऊल पुढे पडले आहे. डार्टशी टक्कर झाल्यानंतर दोन दिवसांनी, खगोलशास्त्रज्ञांनी चिलीमधील दुर्बिणीचा वापर करून छायाचित्रे घेतली. नासाच्या ४.१-मीटर दक्षिणी खगोल भौतिकी संशोधन दुर्बिणीचा वापर करून लघुग्रहाच्या पृष्ठभागावरून उडालेल्या धूळ आणि ढिगाऱ्याची ही छायाचित्रे घेण्यात आली. या नवीन फोटोमध्ये धुळीच्या खुणा दिसल्या. सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या दाबाने दूर ढकलले गेलेले इजेक्टा हे धूमकेतूच्या शेपटीप्रमाणे दिसले.
जाणुन बूजून केलेल्या या उल्कापातामुळे नासाकडे अनेक प्रकारच्या माहितीचा खजिना प्राप्त झाला असून त्यामुळे अंतराळातील खजिना आता नासाला अभ्यासाला मिळणार आहे. अवकाश अभ्यासाच्या दृष्टीने आणि उल्का आणि धुमकेतूच्या अभ्यासासाठी हे संशोधन महत्त्वाचे मानले गेले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस