मुंबई, २३ नोव्हेंबर २०२०: प्रसिद्ध कॉमेडियन भारती सिंह मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. भारती आणि त्यांचा नवरा हर्ष लिंबाचिया यांच्यावर एनसीबीनं आपली पकड घट्ट केलीय. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना ड्रग्ज प्रकरणात मुंबईच्या फोर्ट कोर्टानं न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, भारती आणि हर्ष यांनी आपला जामीन अर्ज न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होईल.
भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांना ४ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. भारती सिंग यांना कल्याण कारागृहात हलविण्यात येईल, तर हर्षला तळोजा तुरूंगात नेण्यात येईल. हे ड्रग्जच्या वापराचं प्रकरण असल्यानं, किला कोर्टात जामीन याचिका दाखल केली जाईल. आता दोन्ही अर्जांवर सोमवारी सुनावणी होणार असून त्यानंतर भारती सिंग यांना आणखी दिलासा मिळणार की नाही हे कळंल.
शनिवारी (२१ नोव्हेंबर) एनसीबीनं मुंबईतील भारती यांच्या घरावर छापा घातला. यावेळी तेथून गांजा जप्त करण्यात आला. चौकशी दरम्यान भारतीसिंग यांनी आपण ड्रग्ज घेतल्याची कबुली दिली. सुमारे ६ तासांच्या चौकशीनंतर भारती यांना अटक करण्यात आली. यानंतर भारती यांचा नवरा हर्ष यांना रात्री उशिरा अटक करण्यात आलं.
रविवारी भारतीसिंग आणि हर्ष लिंबाचिया यांना प्रथम वैद्यकीय आणि कोरोना चाचणीसाठी नेण्यात आलं आणि यानंतर सकाळी ११.३० वाजता भारती आणि हर्ष कोर्टात हजर झाले. भारती आणि हर्ष यांच्यासह दोन ड्रग्ज पेडलर्स कोर्टात हजर झाले. एनसीबीनं भारतीचा पती हर्ष याचा कोर्टाकडून रिमांड मागितला होता पण त्याला यश मिळू शकलं नाही. त्यानंतर कोर्टानं या दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावलीय, तर एनसीबीला दोन पेडलर्सचा रिमांड मिळाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे