गोल पोस्ट महाराष्ट्र कॉमेडियन कुणाल कामराची संजय राऊतांना ”ही” ऑफर 

कॉमेडियन कुणाल कामराची संजय राऊतांना ”ही” ऑफर 

मुंबई, २९ सप्टेंबर २०२०: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना आपल्या ‘शटअप या कुणाल’ या पॉकास्टमध्ये ते सहभागी होण्याची ऑफर दिली आहे. त्याने ट्विट करत संजय राऊतांना याबद्दल विचारणा केली, ज्यात कुणाल कामराने संजय राऊतांनाही टॅग केलं आहे. 

”संजय राऊत सरांनी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून सहभागी होण्याची तयारी दर्शवली, तरच मी ते पुन्हा सुरु करेन. अन्यथा काही शक्यता नाही.” असं ट्विट कुणाल कामराने केलं आहे. संजय राऊत स्वतः मुलाखतकार आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून त्यांनी अनेक दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मुलाखती फारच गाजल्या होत्या. सध्या संजय राऊत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याच्या हालचाली करत आहेत. मात्र आता खुद्द संजय राऊतांचीच मुलाखत घेण्याचा आग्रह कुणाल कामराने केला आहे.  

कुणाल कामराच्या ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्टच्या पहिल्या सीजनमध्ये आतापर्यंत तत्कालिन काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी, गीतकार जावेद अख्तर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांसह अनेक मोठी मंडळी सहभागी झाली होती. त्यामुळे आता संजय राऊत यात सहभागी होतात का हे पाहावं लागेल. 

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

error: Content is protected !!
Exit mobile version