मुंबई, ७ जुलै २०२० : कोरोना व्हायरसने थैमान घातलेले असताना राज्यावर तसेच नागरिकांवर आर्थिक संकट आहे. सामान्य माणसाला स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोरोना व्हायरस आणि आर्थिक चणचण असे दुहेरी संकट असतानाही खाजगी शाळा मात्र फी भरण्यासाठी पालकांवर दबाव आणत आहे. याविरोधात मनसे नेते आणि राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून संकटकाळात पालकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. अमित ठाकरे यांनी आपल्या पत्रात लिहिले कि, कोरोनाच्या संकटकाळात शाळांनी, विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या- आयसीएसई, सीबीएसई, आयबी बोर्डाच्या शाळांनी फी भरण्यात पालकांना येणाऱ्या आर्थिक अडचणी समजून घ्यायला हव्यात.
दुर्दैवाने, काही शाळा अपेक्षित समंजसपणा दाखवत नसून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव टाकत आहेत.
गेल्या आठवड्यात अशाच स्वरूपाच्या तक्रारी घेऊन काही पालक मला भेटूनही गेले. “पालकांकडून शाळांनी वाढीव फी घेऊ नये तसेच फी भरण्यासाठी पालकांवर कोणताही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष दबाव टाकला जाऊ नये , यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वत: सर्व खासगी शाळांच्या व्यवस्थापनांशी संवाद साधून सध्याच्या संकटकाळात पालकांना दिलासा द्यावा” – अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.
त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनाही पत्राद्वारे पालकांच्या समस्या सोडविण्यासाठीची मागणी महाराष्ट नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी :- अक्षय बैसाणे