उस्मानाबाद, ४ ऑगस्ट २०२० : कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. अशा मध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या कोरोना विषाणूचा संसर्ग अतिशय झपाट्याने वाढत असल्याने, इतर आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना खाजगी रुग्णालये उपलब्ध होत नाहीत, आणि जरी रूग्णालये उपलब्ध झाली तरी तेथे उपचारांचा खर्च सामान्य नागरिकांना परवडणारा नाही. कारण, लॉकडाउनमुळे अनेक काम धंदे हे ठप्प पडलेले आहेत. या परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष देऊन, उस्मानाबाद येथील मुस्लिम समाजातील होतकरू लोकांच्या पुढाकारातून शहरात मोहल्ला क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
उस्मानाबाद शहरातील मुस्लिम समाजातील होतकरू नागरिकांच्या पुढाकारातून सामान्य नागरिकांच्या हितासाठी शहरात पहिले मोहल्ला क्लिनिक हे अक्सा चौक, ख्वाजानगर येथे सुरू करण्यात आलेले असून, येथे पहिल्याच दिवशी जवळपास २६ जणांची तपासणी करून त्यांचावर उपचार देखील करण्यात आलेले आहेत. या पहिल्या मोहल्ला क्लिनिकचा शुभारंभ प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, तहसीलदार गणेश माळी, मौलाना अफसर, मौलाना अयुब, यांच्या हस्ते करण्यात आला. या संबंधित क्लिनिक साठी लागणारी जागा ही नगरसेवक खलिफा कुरेशी यांनी मोफत उपलब्ध केली आहे.
क्लिनिकच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात, येथे मोफत सेवा देणाऱ्या डॉ. फय्याम रझवी, डॉ. मिनाज शेख, डॉ. हुसेना सय्यद, डॉ. रमझान शेख, फार्मासिस्ट सादिक शेख, रिजवान शेख, यांचा सत्कार देखील करण्यात आला. संबंधित हे सर्व डॉक्टर दिवसातील दोन तास येथे सेवा देणार आहेत. पहिल्याच दिवशी या क्लिनिक मध्ये जवळपास २६ रूग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आलेला आहे. यासोबतच, अन्य दोन क्लिनिक देखील पुढील २ ते ३ दिवसांत सुरू होणार असल्याची संयोजकांनी माहिती दिली.
नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी या मोहल्ला क्लिनिक मध्ये उपचारासाठी येणाऱ्या गरजू रुग्णांना लागणाऱ्या औषध गोळ्यांचा पुरवठा नगर परिषदच्या वतीने करण्यात येईल असे आश्वासन दिले. तसेच, अशा प्रकारचे क्लिनिक जर प्रत्येक प्रभागात तयार झाले तर तेथेही लागतील तेवढ्या औषध गोळ्यांचा पुरवठा करण्यात येईल. नागरिकांनी ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशाप्रकारचे आजार अंगावर काढू नये, तर दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावेत असे आवाहन देखील त्यांनी नागरिकांना केले.
न्यूजअनकट प्रतिनिधी – प्रगती कराड.