आयुक्तांचा धाक; कुदळवाडी कारवाईत गैरहजर कार्यकारी अभियंत्याला 500 रुपयांचा दंड!

पिंपरी चिंचवड महापालिकेची इमारत, त्यावर मराठीत मथळा:
आयुक्तांचा धाक;

Commissioner Action on Executive Engineer: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. कुदळवाडी परिसरातील अनधिकृत भंगार गोदाम आणि इतर आस्थापनांवर महापालिकेने धडक कारवाई केली. या महत्वाच्या कारवाई दरम्यान गैरहजर राहिल्याबद्दल विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता समीर दळवी यांना आयुक्तांनी तब्बल 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

महापालिकेने कुदळवाडी, जाधववाडी, बालघरेवस्ती, हरगुडेवस्ती, पवारवस्ती या भागांमध्ये अनधिकृत बांधकामांविरोधात मोठी मोहीम हाती घेतली होती. 31 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत चाललेल्या या कारवाईसाठी क क्षेत्रीय कार्यालयातील विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता समीर दळवी यांना त्यांच्या सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांसह उपस्थित राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले होते. मात्र, आश्चर्य म्हणजे या महत्वाच्या काळात दळवी यांनी घटनास्थळाकडे पाठ फिरवली.

त्यांच्या गैरहजेरीमुळे कारवाई दरम्यान अनेक अडचणी आल्या. महावितरणच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यात मोठा अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे कारवाईची प्रक्रिया मंदावली. यामुळे संतप्त झालेल्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दळवी यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही.

कामात दाखवलेल्या या अक्षम्य हलगर्जीपणामुळे दळवी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्यांनी दिलेले स्पष्टीकरण आयुक्तांना समाधानकारक वाटले नाही. त्यामुळे, कामात अनास्था आणि बेफिकिरी दर्शविल्याबद्दल आयुक्त शेखर सिंह यांनी कठोर पाऊल उचलत कार्यकारी अभियंता समीर दळवी यांना 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे, ही दंडाची रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल केली जाणार आहे. यापुढे अशा प्रकारची निष्काळजीपणा आढळल्यास आणखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही आयुक्तांनी दिला आहे, ज्यामुळे इतर अधिकाऱ्यांमध्येही आता चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे