‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटांना विरोध करणाऱ्या माणसांमध्ये आढळून आले साम्य

4

मुंबई,९ मे २०२३: अभिनेता अनुपम खेर यांनी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरी या चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. या दोन्ही चित्रपटांवर अपप्रचार होत असल्याची टीका होत आहे. विरोधाच्या भीतीने पश्चिम बंगाल सरकारने अलीकडेच चित्रपटावर बंदी देखील घातली. आता अनुपम खेर यांनी एक नवीन मुद्दा समोर आणला आहे .त्यांच्या मते, जे लोक दिग्दर्शक सुदीप्तो सेनच्या चित्रपटाला विरोध करत आहेत तेच लोक विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाला देखील विरोध करत होते.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले,’ मी अजून चित्रपट पाहिला नाही, पण पुन्हा, मी म्हणेन की ते तेच चेहरे आहेत. मी चित्रपट पाहिला नाही पण लोक वास्तवाच्या जवळ असलेले चित्रपट बनवत आहेत याचा मला आनंद आहे. आणि ज्यांना हा अपप्रचार वाटतो ते विषय घेऊन चित्रपट बनवण्यास मोकळे आहेत. परिपूर्ण विषय शोधावा त्यांना कोणीही थांबवत नाही.’

विपुल अमरूलाल शाह निर्मित केरळ स्टोरीमध्ये अदा शर्मा, योगिता बिहारी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मूलतः असा दावा करण्यात आला होता की राज्यातील ३२ हजार महिला बेपत्ता झाल्या आणि नंतर ISIS मध्ये सामील झाल्या. तथापि, लोकांनी दाव्यांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हा आकडा तीनवर बदलण्यात आला.

“पश्चिम बंगाल सरकारने द केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी चित्रपटावर बंदी घातल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे ‘काश्मीर फाइल्स’ हि एका विभागाला अपमानित करणारी कथा तर ‘द केरला स्टोरी’ ही एक विकृत कथा आहे असेही त्या म्हणाल्या.

अनेक ठिकाणी बंदी असूनही ज्या चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला, त्या चित्रपटगृहांमध्ये तुडुंब गर्दी करून प्रेक्षकांनी चित्रपटाला दाद दिल्याचे पाहायला मिळते. द केरळ स्टोरी चे अंदाजे बजेट ४० कोटी असेल. आणि काही दिवसातच चित्रपट ५० कोटींचा टप्पा पार करेल. ‘द केरळ स्टोरी’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटांमध्ये संघर्ष आणि प्रदर्शनानंतरचा प्रेक्षकांचा प्रतिसाद या दोन्ही घटकांमध्ये साम्य पाहायला मिळते.

न्यूज अनकट प्रतिनिधी:- ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा