मुंबई, दि.४ जून २०२०: कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे देशातील काम करण्याची पद्धत बदलत आहे. वर्क फ्रॉम होम असेल किंवा ऑनलाइन मिटिंग अशा अनेक गोष्टी होत आहेत. यात आणखी एक मोठा बदल होणार आहे आणि तो म्हणजे नोकरी करण्यासाठी मोठ्या शहरात जाण्याची गरज लागणार नाही. या कोरोनामुळे नागरिकांची काम करण्याची पद्धत बदलत असून त्यांना “वर्क फ्रॉम होम” ची गरज भासू लागली आहे.
देशातील एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी करायची असेल तर महानगरात जावे लागेल असा विचार सर्व जण करतात. मात्र आता लवकरच ही परिस्थिती बदलण्याची स्थिती निर्माण झाली आहे. स्वत:च्या गावात राहून मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गावातील लोकांना शहरात येऊन धक्के खाण्याची आणि झोपडपट्टीत राहण्याची गरज नाही. कारण या मोठ्या कंपन्या आता गावात येणार आहेत.
याबाबत भारतीय उद्योग महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष कोटक महिंद्र बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ उदय कोटकांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, यापुढे ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर होणार नाही. तर शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर केले जाईल. लोकांना आता त्यांच्या घराजवळ रोजगार मिळेल आणि ते कुटुंबासोबत राहू शकतील. त्यांना शहरातील झोपडपट्टीत रहावे लागणार नाही.
मोठ्या कंपन्या ग्रामीण भागात कारखाने सुरू करण्याचा गंभीरपणे विचार करत आहेत, असे उदय कोटक म्हणाले. सीआयआय या गोष्टीसाठी प्रोत्साहन देईल. सध्याच्या परिस्थिती सरकार सुधारणे संदर्भात पाऊल उचलत आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधेवर काम केले जात असल्यामुळे येथे नोकरी करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
कोरोनामुळे देशातील लाखो कुशल लोक शहरातून गावात स्थलांतरीत झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण परिसरात कारखाने सुरू करणाऱ्यांना कुशल कामगारांची कमतरता जाणवणार नाही. गरज वाटली तर त्यांना प्रशिक्षण देता येईल.
लॉकडाऊनमुळे एक नवी गोष्टी शिकण्यास मिळाली ती म्हणजे वर्क फ्रॉम होम . काम करण्याची ही नवी पद्धत पुढे देखील उपयोगी पडणार आहे. गावात राहून वर्क फ्रॉम होम करता येऊ शकते. कारण प्रत्येक गावात ब्रॉडबँड इंटरनेट पोहोचल्याचे कोटक यांनी सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: