‘त्या’ व्हायरल व्हिडिओतील मोलकरणीची तुलना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी ?

मुंबई, दि. ३० ऑगस्ट २०२०: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. एखादा फोटो, व्हिडीओ किंवा मीम अचानकपणे व्हायरल होते आणि मग त्यावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडतो. आता तर राजकारणी मंडळीही अशा व्हायरल ट्रेंड्सचा वापर राजकारणात भलत्याच क्रिएटिव्ह पद्धतीनं करतात. आज एका भांडणाऱ्या मोलकरणीचा गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल झालायं. ज्यात ती मोलकरीण १८०० रुपये मागताना दिसतेय. या व्हिडिओला प्रत्येकजण आपापल्या परीनं कॅप्शन देऊन शेयर करत आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबेंनी सुद्धा हा व्हिडीओ ट्विट केलायं. मात्र त्यांनी या व्हिडिओत दिसणाऱ्या मोलकरणीची तुलना चक्क अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी केल्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

काय आहे व्हिडिओत?

२ मिनिटं २० सेकंदांच्या या व्हिडिओत मोलकरीण आणि तरुण यांच्यात पैशांवरून वाद झालेला दिसतोय. यात मोलकरीण तिच्या कामाचे १८०० रुपये तरुणाकडून मागतेय. मात्र त्याने अगोदरच १८०० रुपये दिल्याचं तो सांगतो. पण अशिक्षित असलेल्या या मोलकरणीला आपली फसवणूक झाल्यासारखं वाटतं आणि ती या तरुणाशी वाद घालते. व्हिडिओत बॅचलर दिसत असलेला हा तरुण वैतागून कॅल्क्युलेटर घेऊन त्या महिलेला हिशोब समजावण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही ती महिला काही ऐकत नाही. मुळात त्या तरुणानं ५०० च्या तीन नोटा, २०० ची एक नोट आणि १०० ची एक नोट असे मिळून १८०० रुपये त्या मोलकरणीला दिलेले असतात. मात्र अशिक्षित असलेल्या त्या महिलेला हा हिशोब कळतंच नाही आणि ती वाद घालत पैसे मागते. हा प्रकार तरुणाच्या मित्रांना खूप गंमतीशीर वाटत होता, त्यामुळे एकाने मोबाईल कॅमेऱ्यात तो व्हिडीओ शूट केला आणि तो आता प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ नक्की कुठला आहे आणि कधीचा आहे याबाबत मात्र माहिती मिळालेली नाही.

सत्यजीत तांबेंनी नेमकं काय ट्विट केलं?

महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून आज म्हणजेच ३० ऑगस्टला दुपारी १२ वाजून २६ मिनिटांना हा व्हिडीओ अपलोड केला. या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन दिलं कि, ”निर्मला काकू, अर्थतज्ञांशी निर्मला काकू, अर्थतज्ञांशी जीडीपी ठरवण्याच्या पध्दतीबाबत चर्चा करतांना… ठरवण्याच्या पध्दतीबाबत चर्चा करतांना… ” सत्यजीत तांबेंनी हे ट्विट करून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना एकप्रकारे टोला लगावत त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभा केलायं. त्यांच्या या ट्विटवर हजाराच्या वर लाईक्स, शेकडो रिट्विट्स आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडतोय. मात्र त्यांनी निर्मला सीतारामन यांची मोलकरणीशी केलेली तुलना नवा वाद निर्माण करू शकते.
देशात यापूर्वीच अर्थव्यवस्था, बेरोजगारी यांसारख्या समस्या मोठ्या प्रमाणात होत्या. त्यात कोरोना आणि त्यामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊननं अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं आहे. देशाचा जीडीपी तळाला गेला आहे. अनेक राज्यांचे जीएसटीचे पैसे केंद्र सरकारनं परत दिले नाही, त्याला विलंब लावला जातोय. त्यामुळं सरकारच्या आर्थिक धोरणांवर सर्वत्र टीका होतेयं. मात्र एकमेकांवर टीका करत असताना राजकारणी मंडळीही सोशल मीडिया आणि व्हायरल ट्रेंड्सचा पुरेपूर वापर करताना दिसतायत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा