राहुल गांधी यांची शिवरायांशी तुलना अयोग्य, काँग्रेसने माफी मागण्याची बावनकुळे यांची मागणी

मुंबई, २४ मे २०२३ -: काँग्रेसकडून एका व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. त्यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. तो व्हीडिओ डिलीट करावा, आणि काँग्रेसने देशाची जाहीर माफी मागावी. अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

काँग्रेसकडून राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. यात भारत जोडो यात्रेसह कर्नाटक निवडणूकिसह इतर ठिकाणचे राहुल गांधी यांचे व्हीडिओ आणि फोटो आहेत. याला बँगराऊंड म्युझिकही देण्यात आले आहे. एक-एक करून सगळे गड जिंकायचे आहेत. सगळ्या शत्रूंशी लढून प्रत्येक मैदान जिंकायचे आहे, असे कॅप्शन या व्हीडिओला देण्यात आले आहे.यावर भाजपने आक्षेप घेतला आहे.

यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना राहुल गांधी यांच्याशी करणे योग्य नाही. शिवरायांसमोर राहुल गांधी हे मायनस झिरो आहेत. तातडीने काँग्रेस पक्षाने हा व्हीडिओ सर्व माध्यमांवरून डिलीट केला पाहिजे. तातडीने देशाची आणि शिवप्रेमींची माफी मागीतली पाहिजे. जर हा व्हीडिओ डिलीट केला नाही तर भाजपकडून महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल.

बावनकुळे यांच्या आरोपांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उत्तर दिले आहे. राहुल गांधी हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारी व्यक्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार घेऊन चालने जर भाजपच्या दृष्टीने अयोग्य असेल. तर शिवरायांचा विचार महाराष्ट्रासह देशात रुजवण्याचा निर्धार काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांनी केला आहे. असे नाना पटोले म्हणाले.माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला तेव्हा तुमचे तोंड का बंद होते ? असा सवालही नाना पटोले यांनी भाजपला विचारला आहे.

दरम्यान काँग्रेसच्या या व्हिडिओवरून नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारत, प्रतिकात्मक पुतळा दहन करून आंदोलन केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा