Villagers Strongly Oppose: हिंजवडी-माण रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला अचानक ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी स्थानिक जागा मालकांना विश्वासात न घेतल्याने, ग्रामस्थांनी या कामाला जोरदार विरोध दर्शवला आहे. ‘आधी मोबदल्याचं बोला, मग भूसंपादन करा’ अशी आक्रमक भूमिका हिंजवडी-माण ग्रामस्थांनी घेतली आहे.
हिंजवडी-माण रस्त्याच्या कडेला असलेली अनधिकृत दुकाने, शेड आणि घरे निष्कासित करण्याची प्रक्रिया सध्या जोरदार सुरू आहे. या प्रक्रियेत स्थानिक ग्रामस्थ प्रशासनाला सहकार्य करत आहेत. मात्र, प्रशासनाने रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक असणारी जागा ताब्यात घेताना मूळ जागा मालकांना विश्वासात घेतलं पाहिजे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“आमच्या वडिलोपार्जित आणि मालकी हक्काच्या जागा प्रस्तावित रस्त्यासाठी द्यायला आम्ही तयार आहोत, परंतु साहेब आधी मोबदल्याचं बोला, मग भूसंपादन करा,” असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे. यासंदर्भात परिसरातील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने पीएमआरडीए कार्यालयाला भेट देऊन निवेदनही दिले आहे.
हिंजवडी-माण रस्त्यावरील दैनंदिन वाहतूक कोंडीला स्थानिक ग्रामस्थही वैतागले आहेत. रस्ते प्रशस्त झालेच पाहिजेत, यावर ग्रामस्थांचे एकमत आहे. मात्र, प्रशासनाने अनधिकृत शेड काढण्याच्या नावाखाली स्थानिक जागा मालकांचे एकप्रकारे भूसंपादन सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे, रस्त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कायदेशीर भूसंपादन प्रक्रियेचा अवलंब करून, जागामालकांना विश्वासात घेऊनच प्रशासनाने जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
या प्रकरणी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून ग्रामस्थांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी; सोनाली तांबे