इंदापूर, २५ ऑक्टोबर २०२०: इंदापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती एकाच वेळी निर्माण झाल्याने शेतीपिकांचे व घरांचे राज्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. मात्र सध्या नुकसानग्रस्त पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे केले जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित नये, त्याकरिता शासनाने नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे पुर्ण करावेत, अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी (दि.25) केली आहे.
ते पुढे म्हणाले, इंदापूर तालुक्यात व जिल्ह्यामध्ये दि. 14 व 15 ऑक्टो. रोजी अतिवृष्टी होऊन निरा व भीमा नदीला महापूर आला. त्यामुळे खरीप हंगामातील मका, बाजरी, कांदा, कडवळ आदी पिके पुर्णपणे वाया गेली. तसेच फळबागा व ऊस पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अजुनही शेतात पाणी आहे. त्यामुळे कधी नव्हे एवढा शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्याचबरोबर गावोगावच्या अनेक घरांची पुरामुळे व अतिवृष्टीने हानी झाली आहे. सध्या मात्र नुकसान झालेली खरीप पिके, ऊस , फळबागा तसेच घरांचे कालबाह्य नियम पुढे करून अनेक ठिकाणी सरसकट पंचनामे होत नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळणे पासून अनेक शेतकरी व नागरिक वंचित राहण्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत.
इंदापूर तालुक्यांमध्ये झालेल्या नुकसानीची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त सर्व पिकांचे व घरांचे सरसकट पंचनामे करणे गरजेचे आहे. पंचनाम्याअभावी एकही नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिक वंचित राहणार नाही, याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी. तात्काळ सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम जमा करावी, अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे. आम्ही सत्तेवर असताना नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करून शेतकरी वर्गाला वेळोवेळी मोठी आर्थिक मदत केली आहे, याचा अनुभव तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे, असेही यावेळी पाटील यांनी नमूद केले.
शासनाने बागायती पिकासाठी एकरी रु. ४ हजार व फळबागांसाठी 10 हजार एवढी तुटपुंजी मदत जाहीर केले आहे. सदरची मदत देतानाही नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे केले जात नाहीत, ही खेदाची बाब असल्याचे याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी संगितले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल कणसे.