लातूर, दि.९ जून २०२०: लातूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची कामे संबंधीत विभागाने वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, रोजगार हमी, भुकंप पुनर्वसन व संसदीयकार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित उदगीर व जळकोट तालुक्यातील पाणी पुरवठा जलसंधारण विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता कायंदे, जलसंधारणचे अभियंता श्रीमती ठोंबरे, उदगीर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती सिध्देश्वर पाटील उपस्थित होते.
यावेळी बनसोडे म्हणाले की, जिल्ह्यात तसेच उदगीर व जळकोट तालुक्यात पाणी पुरवठा योजनेची कामे चालू आहेत. ती कामे वेळेत पुर्ण करण्याच्या सूचना देऊन या पुढे उदगीर व जळकोट तालुक्यात जल जीवन मिशन योजना राबविणार असल्याचे सूचित केले.
या तालुक्यातील कालवा दुरुस्तीचे प्रस्ताव तात्काळ संबंधित विभागाने दाखल करावेत. त्यास जिल्हा नियोजन मंडळांकडून निधी मिळवून देऊ तसेच या तालुक्यातील नाला खोलीकरण, केटीवेअर बंधारे यांचे प्रस्ताव शासनास ताबडतोबीने सादर करावेत अशा सूचना दिल्या.
न्युज अनकट प्रतिनिधी: