एटीएसला कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या, पुढील तपासासाठी हायकोर्टाकडून तीन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई २९ जून २०२३: कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा नव्याने तपास करणाऱ्या दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) मुंबई उच्च न्यायालयाने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणातील आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोन आरोपी अद्यापही फरारी असल्याचे एटीएसने हायकोर्टाला सांगितले.

पानसरे यांच्या हत्येचा तपास कुठपर्यंत आला? तपासात प्रगती किती झाली?, अशी विचारणा बुधवारच्या सुनावणीत न्यायालयाकडून करण्यात आली. यावर फरार आरोपींचा शोध अद्यापही सुरू आहे. हे आरोपी अन्य खटल्यांशीही जोडलेले असल्याचे सांगून पुढील तपासासाठी मुदतवाढ देण्याची विनंती एटीसकडून हायकोर्टाकडे करण्यात आली. त्याची दखल घेऊन न्यायमीर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती एस. जी. डिगे यांच्या खंडपीठानं एटीएसला तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.

बुधवारी एटीएसकडून या तपासाचा प्रगती अहवाल सीलबंद लिफाफ्यातून हायकोर्टात सादर करण्यात आला. याप्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयात खटला सुरु झाला असून सहा साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले आहेत. तर अद्यापही फरार असलेल्या दोन आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती एटीएसच्यावतीने ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी हायकोर्टाला दिली. याप्रकरणी आजवर पाच आरोपपत्र दाखल झाली असून उर्वरित तपासही सुरू असल्याचे त्यांनी हायकोर्टाला सांगितले. यातील फरार आरोपी वगळता तपासातील प्रगतीबाबत हायकोर्टाने एटीएसकडे विचारणा केली असता, अनेक प्रश्नांची उत्तरे आता जरी आमच्याकडे नसली तरीही भविष्यात ती नक्कीच मिळू शकतात. गोविंद पानसरेंच्या हत्येशी अन्य काही खटलेही जोडलेले आहेत. त्यामुळे पुढील तपासासाठी दोन ते तीन महिन्यांची मुदतवाढ अपेक्षित असल्याचेही मुंदरगी यांनी हायकोर्टाला सांगितले.

विक्रम भावे आणि शरद कळसकर या दोन आरोपींनी याप्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावल्यानंतर आता आम्ही यावर पुन्हा नव्याने सुनावणी घेऊ शकत नसल्याचे स्पष्ट करून हायकोर्टाने त्यांची बाजू ऐकण्यास नकार दिला होता.

२० फेब्रुवारी २०१५ रोजी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्याच दरम्यान अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि दक्षिणेतील विचारवंत एम. एम. कलबुर्गी, जेष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्याही हत्येच्या कटाचे सूत्रधार एकच असल्याचा आरोप असून मुख्य सूत्रधाराचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे हा तपास एसआयटीऐवजी एटीएसमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी पानसरे कुटुंबियांनी न्यायालयाकडे केली होती. त्यांची ही मागणी मान्य करून अनेक वर्षांनी हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे सोपवला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा