चक्रीवादळ, अतिवृष्टीच्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे : डुडी

पुणे, दि.२ जून २०२०: महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर ३ व ४ जून रोजी “निसर्ग” या चक्रीवादळाचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यात जुन्नर व आंबेगाव हे तालुके दक्षता क्षेत्रात येत आहेत. तरी याबाबत आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत उपाययोजना करुन संबंधित अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे,अशा सूचना जुन्नर- आंबेगाव उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या. याबाबत जुन्नर- आंबेगाव उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, यांनी जुन्नर व आंबेगाव तालुक्याच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक आयोजित केली होती. यावेळी ते बोलत होते बैठकीस तालुक्यातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

यावेळी डुडी म्हणाले की, “निसर्ग”या चक्रीवादळाचा तडाखा व अतिवृष्टीपासून संभाव्य बाधित कुटूंबांचे स्थलांतर करताना कोरोना(कोविड-१९) या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे व मुंबई तसेच इतर ठिकाणावरून आलेल्या लोकांचे विलगीकरणाबाबत खबरदारी घेवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. तसेच स्थलांतर करताना कोरोना(कोविड-१९) या आजाराच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर ठेवावे. या कालावधीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ यांनी डोंगराळ भागातील गावांमध्ये आवश्यक त्या ठिकाणी दुरूस्तीसाठी व समन्वयासाठी पथकांची व वाहनांची नेमणूक करावी.

तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी संभाव्य धोक्याची ठिकाणे ओळखून त्या ठिकाणी तात्काळ उपाययोजना करण्यासाठी शासकीय व खाजगी जेसीबी उपलब्ध ठेवण्यात याव्यात. तसेच त्यांचा संपर्क क्रमांक स्थानिक प्राधिकरणास देण्यात द्यावा.

वनविभागाने संभाव्य धोकादायक ठिकाणी पथके नेमून कोरोना(कोविड-१९) या आजाराच्या पार्श्वभूमीवर इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवून उपाययोजनेच्या दृष्टीकोनातून तात्काळ कार्यवाही करावी. दिनांक ३ व ४ जून २०२० रोजी “निसर्ग”या चक्रीवादळाच्या व अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व लोकांनी सुरक्षितपणे घरातच थांबावे, या कालावधीत भूस्खलन होण्याची व महापूर येण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी विशेष खबरदारी घ्यावी व घराबाहेर पडू नये, असेही आवाहन डुडी यांनी केले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा