देशातील तुरुंगांची अवस्था दयनीय, ​​क्षमतेपेक्षा अधिक १.२८ लाख कैदी कारागृहात, उत्तर प्रदेश केंद्र पहिल्या क्रमांकावर

नवी दिल्ली, १६ मार्च २०२३ : देशातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा एक लाख २८ हजार ४२५ कैदी बंद आहेत. कारागृहांमध्ये ४ लाख २५ हजार ६०९ कैदी ठेवण्याची क्षमता आहे, तर ५ लाख ५४ हजार ३४ कैदी कारागृहात आहेत. शिक्षा पूर्ण होऊनही दंडाची रक्कम भरू न शकल्याने देशातील कारागृहांमध्ये शिक्षा झालेले १४१० कैदी तुरुंगात असल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून लोकसभेत देण्यात आली.

तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्याच्या बाबतीत देशातील सर्वांत मोठे राज्य यूपी आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील तुरुंगांमध्ये कैद्यांना ठेवण्याची क्षमता ६३,७५१ आहे, तर प्रत्यक्षात तुरुंगांमध्ये १,१७,७८९ कैदी आहेत. म्हणजे ५३,०३८ कैदी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त तुरुंगात आहेत. दुसऱ्या क्रमांकावर बिहार आहे, जिथे ४७,७५० कैद्यांना ठेवण्याची क्षमता आहे, तर त्यांची एकूण संख्या ६६,८७९ आहे. म्हणजे १९,१२९ कैदी क्षमतेपेक्षा जास्त आहेत.

दुसरीकडे, मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे तुरुंगांची एकूण क्षमता २९,५७१ आहे, तर कैद्यांची संख्या ४८,५१३ आहे. येथे १८,९४२ कैद्यांना अतिरिक्त ठेवण्यात आले आहे. या क्रमवारीत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर असून, येथील कारागृहात २४,७२२ कैदी ठेवण्याची क्षमता आहे, तर प्रत्यक्षात ३६,८८५ कैदी आहेत. याशिवाय आसाम, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेल्या राज्यांमध्ये आहे.

कैद्यांना तुरुंगात ठेवण्याबाबत असमतोल मोठ्या राज्यांमध्ये अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. यूपीच्या तुरुंगात कैद्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे गृह मंत्रालयाने जारी केलेल्या यादीनुसार, यूपीमधील तुरुंगांमध्ये एकूण ९०,६०६ कैदी बंद आहेत, त्यापैकी २१,९४२ अनुसूचित जातीचे, तर ४६५७ अनुसूचित जमातीचे कैदी तुरुंगात आहेत. यूपीच्या तुरुंगात ओबीसी प्रवर्गातील ४१,६७८ कैदी बंद आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने लोकसभेत देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील अंडरट्रायल कैद्यांची माहिती दिली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा