पुणे, दि. ५ मे २०२० : कोरोनाच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद करण्यात आले होते. त्यामध्ये वर्तमानपत्रांचा देखील समावेश होता. करोना विषाणूंचा प्रसार वर्तमानपत्रांमुळे देखील होऊ शकतो. या चर्चेमुळे मागील ४० दिवसांपासून वर्तमानपत्रांचे वितरण बंद होते. मात्र, आता इतर व्यवसाय हळूहळू सुरु करण्यात आल्याने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता वर्तमानपत्र वितरणालाही सशर्त परवानगी देण्यात आली आहे, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी यासंदर्भातील आदेश काढला आहे.
शेखर गायकवाड यांचे आदेश:
पुणे वृत्तपत्र असोसिएशनने निवेदनाद्वारे वृत्तपत्रांची छपाई व वितरण अत्यावश्यक असून संपूर्ण महाराष्ट्रात केवळ पुण्यामध्ये वर्तमानपत्रांचे वितरण केले जात नाही, ही बाब प्रशासनास निदर्शनास आणून दिली. यावर शेखर गायकवाड (महापालिका आयुक्त, पुणे) यांनी भारतीय साथ रोग अधिनियम १८९७ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार पुणे मनपा हद्दीमध्ये वर्तमानपत्रांच्या वितरणाबाबत आदेश
निर्गमित केले आहेत.
या आहेत अटी:
१. प्रतिबंधित हद्दीच्या बाहेर वर्तमानपत्रांचे वितरण करावे.
२. वर्तमानपत्रांचे वितरण हे सकाळी ७.०० ते सकाळी १०.०० या वेळेमध्ये करण्यात यावे.
३. घरोघरी वर्तमानपत्रांचे वितरण करीत असताना वर्तमानपत्र घेणाऱ्या व्यक्तीच्या संमतीने वितरण करण्यात यावे.
४. वर्तमानपत्राचे वितरण करणाऱ्या व्यक्तीने मास्क घालणे, स्वतःजवळ हॅन्ड सॅनिटायझर बाळगणे व त्याचा वापर करणे, दोन व्यक्तींमधील विहीत अंतराची मर्यादा पाळणे आवश्यक असणार आहे.
५. काही सहकारी सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन वर्तमानपत्रांचे वितरणास परवानगी दिली नाही तर सोसायटीच्या कार्यालयापर्यंत वर्तमानपत्रांचे वितरण करण्यात यावे.
न्यूज अनकट प्रतिनिधी