काँग्रेसकडून विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड

मुंबई, १ ऑगस्ट २०२३ : राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करत अजित पवार आपल्या समर्थक ४० आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. त्याआधी अजित दादांकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद होते, मात्र पवार सरकारमध्ये गेल्यावर या पदावर संख्याबळानुसार काँग्रेस पक्षाने दावा केला होता.पंरतु अधिवेशन सुरू झाले तरीही काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले नव्हते. अशातच आता काँग्रेसकडून विरोधी पक्षनेत्याच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदी विदर्भातील (चंद्रपूर) ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या बरोबरच या पदासाठी संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांची नावे चर्चेत होती. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी विजय वडेट्टीवार यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे.

पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. अधिवेशनाचे कामकाज काही दिवसांचे शिल्लक राहिले आहे. मात्र तरीसुद्धा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदी कोणाचीही निवड झालेली नव्हती. विजय वडेट्टीवार यांच्याकडे दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. याआधी २०१९ मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद देण्यात आले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा