पुणे, २९ डिसेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार बुधवारी (ता. २८) पुण्यातील काँग्रेस कार्यालयाला पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भेट देताना म्हणाले, की काँग्रेसमुक्त भारत शक्य नाही. कारण पक्षाची विचारधारा आणि योगदान कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही. या ठिकाणी अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यातील अनेक दिग्गजांनी या ठिकाणी भेट दिली आहे. यापूर्वी पुणे काँग्रेसचे कार्यालय हे राज्याचे मुख्य कार्यालय होते, असे शरद पवार यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना सांगितले.
काँग्रेसचे योगदान आणि इतिहास दुर्लक्षित करता येणार नाही. काही लोक म्हणतात, की आम्ही काँग्रेसमुक्त भारत बनवू; पण भारत काँग्रेसमुक्त करणे शक्य नाही. खरे तर भारताला पुढे न्यायचे असेल तर काँग्रेसला पुढे न्यायचे आहे, या विचारसरणीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काँग्रेसचे योगदान आणि इतिहास आम्ही विसरू शकत नाही. महाराष्ट्रातील आणि राष्ट्रीय पातळीवरील सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष म्हणाले. मला खात्री आहे, की काँग्रेसमुक्त भारत म्हणणाऱ्या विचारसरणीला तोंड देण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल. पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडून स्वत:चा पक्ष स्थापन केला; मात्र नंतर त्यांनी काँग्रेससोबत युती केली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतातील सर्वांत मोठा विरोधी पक्ष, २८ डिसेंबर रोजी त्याचा १३८ वा स्थापना दिवस साजरा केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोमय्या ग्राउंड, मुंबई येथे मोठ्या रॅलीत उपस्थित होते. यावेळी कन्हैया कुमार, नाना पटोले, के. सी. वेणुगोपाल, अशोक चव्हाण आदी काँग्रेसचे नेते उपस्थित होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबई येथे दास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात ७२ प्रतिनिधींच्या उपस्थितीत झाली. त्याचे संस्थापक सरचिटणीस ए. ओ. ह्यूम, तर व्योमेश चंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड