काँग्रेसला भगदाड…राजकारणातले वावटळ

मुंबई, २ सप्टेंबर २०२२: राजकारण हे वादळाने भरले आहे, हे जरी सत्य असलं तरी त्याच वादळात कधी कधी चक्रीवादळाची भर पडते, हे ही तितकंच सत्य आहे. अशी स्थिती सध्या राजकारणाची झाली आहे. त्यात खास करुन काँग्रेस पक्षाची अवस्था ना इथून बळ, ना तिथून बळ अशी झाली आहे. याचे कारण आताच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची गोपनीय भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. पण या एका माहितीवरुन अनेक चर्चांना हवा मिळाली आहे.

सध्या काँग्रेसची सर्व स्तरावर स्थिती अतिशय बिकट आहे. त्यातही खास करुन केंद्र सरकारच्या स्तरावर गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला राम-राम केला. त्यांनंतर त्यांच्यापाठोपाठ आता नऊ जणांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. ही परिस्थिती दिल्ली तीरावर होत असताना, आता मुंबईतही अनेक वादळी घडामोडी घडत असल्याचं चित्र आहे.

मुंबईत काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत नक्की काय दडलयं, हे अजून समजलेलं नाही. पण एका मुलाखतीत अशोक चव्हाण यांनी बोलताना सांगितलं की मी देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारी असतो, कायम त्यांच्याशी सगळ्या गोष्टी बोलत असतो. हे वाक्य महिन्याभरापूर्वी त्यांनी सांगितले. सूत्रांनुसार अशोक चव्हाण यांच्यासह तब्बल नऊ आमदार भाजपमध्ये समाविष्ट होणार अशी चर्चा रंगत आहे. मात्र ही भेट राजकिय नसल्याचं स्पष्टीकरण अशोक चव्हाण यांनी दिलं आहे.

सध्या एकुणातच काँग्रेस पक्षाची पडझड होताना दिसत आहे. एकेक सदस्य गळून आता काँग्रेस पक्ष संपतो की काय, अशी स्थिती काही काळातच निर्माण होते की काय? असे वाटल्यास नवल वाटणार नाही. नुकतेच बाळासाहेब थोरात यांनी मविआवर टीका करत सांगितले होते की, कोणताही निर्णय घेताना मविआ काँग्रेसला विचारात घेत नाही. यावरुन त्यांची नाराजी स्पष्ट झाली होती. त्यामुळे त्या नाराजीचा हा परिणाम असू शकतो का? की या मागे अनेक कुरघोडी आहेत, त्यातून काँग्रेसची काय स्थिती होणार ? हे आता काळच ठरवेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा