“काँग्रेस अंतर्गत वादामुळे जर्जर” –  संजय राऊत

मुंबई, ३० ऑगस्ट २०२०: काँग्रेस अंतर्गत वादामुळे जर्जर झाला आहे, असं विधान आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलं आहे. आज माध्यमांशी  बोलत असताना त्यांनी असं विधान केलं आहे. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. गेल्या दीडशे वर्षांपासून काँग्रेसनं देशातील अनेक चळवळीत, आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसनं आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्तेत असलं तर सत्ताधारी पक्षा सारखं व सत्तेत नसलं तर विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे बजावायला हवी. दुर्दैवाने ते आज काँग्रेसमध्ये दिसत नाही, असं यावेळी राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “काँग्रेस अंतर्गत वादामुळे जर्जर झाला आहे. हे माझं वैयक्तिक मत आहे. असं असलं तरीही अनेकांना देखील असंच वाटत आहे. मी किंवा माझा पक्ष या विचारांचा नसला तरी काँग्रेस तिकडं लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे. मधल्या काळात काँग्रेसच्या प्रमुख २३ नेत्यांनी सोनिया गांधी यांना जे पत्र पाठवलं होतं त्याचं वादळ अद्याप शमलेलं दिसत नाही. त्यामुळं काँग्रेस पक्ष आणखीनच खिळखिळा होत आहे काय अशी चिंता माझ्यासारख्या माणसाला वाटत आहे.”

गांधी कुटुंबाविषयी ते म्हणाले की, “राहुल गांधी हे पक्षातील प्रमुख नेतृत्व आहेत. त्यांनी हे वादळ शमवण्याचा प्रयत्न करायला हवा. काँग्रेसमधील प्रमुख तेवीस नेत्यांनी केलेली मागणी चुकीची नाही. काँग्रेसला निश्चितच एका प्रभावी नेतृत्वाची गरज आहे. परंतु, नेतृत्व कोणाचं असणार आहे हे सांगायला देखील ते तयार नाहीत.

नेतृत्व करण्यासाठी त्या तोडीची व्यक्ती देखील हवी. काँग्रेस पक्षाला गांधी परिवाराशिवाय पर्याय नाही ही लोकभावना आहे. हा सर्व विषय काँग्रेसमधील अंतर्गत असला तरी तो देशाच्या राजकारणाशी निगडित आहे त्यामुळे मी माझं मत मांडत आहे.”

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा