मणिपूरमधील स्थितीला काँग्रेसच जबाबदार, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा काँग्रेस वर घणाघात

7

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट २०२३ : गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरु असलेल्या हिंसाचारासाठी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांना जबाबदार ठरवले जात आहे. दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एन बिरेन सिंह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, राज्यात शांतता निर्माण करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या मार्गदर्शनानंतर राज्यामध्ये शांतता निर्माण झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

मणिपूरच्या हिंसाचारावर राहुल गांधी यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. यावर बोलतांना बिरेन सिंह यांनी म्हटलं की, ‘राहुल गांधी हे लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी लडाखविषयी बोलावं. आज मणिपूमध्ये जे घडत आहे त्यासाठी काँग्रेसच जबाबदार आहे. माणसांच्या आयुष्याशी राजकारण केलं नाही पाहिजे.

मणिपूरमध्ये ३ मेपासून सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी गुरुवारी, २४ ऑगस्ट रोजी शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान इम्फाळ पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यांमधून चार बंदुका, ३८ काडतुसे आणि ८ बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. मणिपूर पोलिस नियंत्रण कक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार, काकचिंग, कांगपोकपी आणि थौबल जिल्ह्यांव्यतिरिक्त इम्फाळ पूर्व-पश्चिम संवेदनशील भागात शोध मोहीम राबविण्यात आली.

मणिपूर पोलिसांनी राज्यातील सर्वसामान्य जनतेला अफवांवर विश्वास ठेवू नका आणि बनावट व्हिडिओंपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच कोणताही व्हिडीओ खरा आहे की खोटा याची खात्री करण्यासाठी सेंट्रल कंट्रोल रूमचा नंबर -९२३३५२२८२२ – जारी करण्यात आला आहे. लुटलेली शस्त्रे, दारूगोळा आणि स्फोटके त्वरित परत करण्याचे आवाहनही पोलिसांनी जनतेला केले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा