चंदीगड, ३१ मार्च २०२३: पंजाबचे काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दूंची उद्या पटियाला तुरुंगातून सुटका होणार आहे. १९८८ च्या रोड रेज प्रकरणात त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने सिध्दूंना शिक्षा जाहीर केली होती. गेल्या वर्षी १९ मे रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं. २६ जानेवारी रोजी ‘आझादी का अमृत महोत्सव’ योजनेअंतर्गत नवज्योतसिंग सिध्दू यांची मुदतपूर्व सुटका झाल्याची बातमी समोर आली होती.
या योजनेअंतर्गत ५२ कैद्यांच्या यादीत सिध्दू यांचं नावही सामाविष्ट असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण, पंजाब सरकारने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला होता. आता त्यांना १ एप्रिल रोजी सोडलं जाऊ शकतं. जिथं त्यांना ४५ दिवसांची सूट मिळत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांची शिक्षा १६ मे रोजी पूर्ण होत असली तरी चांगल्या वर्तणुकीमुळं त्यांची सुटका होत आहे.
आतापर्यंतच्या शिक्षेत सिध्दूंनी एकदाही पॅरोल घेतलेला नाही. तज्ज्ञांचे मते, अंमली पदार्थांची तस्करी आणि इतर गंभीर गुन्ह्यांमधील कैदी वगळता इतर सर्वांना त्यांच्या कामातील कामगिरी आणि वर्णनाच्या आधारावर महिन्यातून चार ते पाच दिवसांची सवलत दिली जाते. अशा परिस्थितीत या सुटचा फायदा घेत सिध्दू यांची १ एप्रिलला तुरुंगातून सुटका होऊ शकते, असं सांगण्यात आलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर











































