नवी दिल्ली, २८ डिसेंबर २०२२ : भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सुरक्षा व्यवस्थेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला असून, याबाबत काँग्रेसकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्राद्वारे तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाचे महासचिव के सी वेणूगोपाल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. या पत्रात त्यांनी भारत जोडो यात्रेत कॉंग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जी होत असल्याचे म्हटले आहे. यापुढे पंजाब आणि जम्मू काश्मीर सारख्या संवेदनशील भागातून ही यात्रा जात असल्याने खबरदारी म्हणून राहुल गांधींची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.
नेमके काय आहे पत्रात ?
भारत जोडो यात्रा २४ डिसेंबरल दिल्लीत पोहोचल्यानंतर राहुल गांधींच्या सुरक्षेमध्ये अनेकवेळा चुका झाल्या आहेत. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आणि त्यांच्याभोवती सुरक्षा व्यवस्था राखण्यात दिल्ली पोलिसांना अपयश आले. राहुल गांधींना झेड प्लस सुरक्षा आहे. तरीही परिस्थिती खूपच बिघडली. भारत यात्रेत सहभागी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि प्रवाशांना सुरक्षा घेराबंदी करावी लागली, असे केसी वेणुगोपाल यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- सुरक्षेच्या मुद्द्यावर राजकारण नको
केसी वेणुगोपाल यांनी म्हटले की, कलम १९ अन्वये कोणतीही व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत प्रदर्शन करू शकते किंवा प्रवास करू शकते. आपले विचार व्यक्त करू शकते. राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येचा संदर्भ देत केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आपले दोन नेते गमावले आहेत आणि अशा परिस्थितीत राहुल गांधींच्या सुरक्षेशी खेळू नये आणि राजकारण करू नये. तसेच भारत जोडो यात्रा ३ जानेवारी २०२२ पासून पुढील टप्प्यात पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या संवेदनशील राज्यात प्रवेश करण्यासाठी सज्ज आहे. या संदर्भात, मी तुम्हाला विनंती करतो की राहुल गांधी यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी त्वरित पावले उचलावीत, असे म्हटले आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.