बारामती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस ओबीसी सेलचा दावा

बारामती २६ फेब्रुवारी २०२४ : देशात लोकसभा निवडणूक होऊ घातल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर विविध पक्ष आघाडी आणि युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार आहेत. आघाडी किंवा युतीमधून आपल्याच पक्षाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात याबाबत सर्वच पक्षांची धावपळ सुरू आहे. अशातच आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी राष्ट्रीय काँग्रेसच्या ओबीसी सेल वतीने पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांच्या नावाची शिफारस केली आहे. काँग्रेसने या जागेवर राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी यामध्ये करण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा तशी पाहिली तर आघाडी मध्ये ती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे या मागील तीन टर्म बारामतीच्या खासदार आहेत. आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादीकडे जाईल असं म्हटलं जात असलं तरी काँग्रेसच्या ओबीसी सेलने मात्र वेगळी भूमिका घेतली आहे. या मतदारसंघांमध्ये ओबीसी मतदारांची संख्या पाहता ही जागा ओबीसी समाजातून येणाऱ्या उमेदवाराला देण्यात यावी अशी मागणी करण्यात आलीय. त्यातही पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस ओबीसी सेलचे काम करणारे राजेंद्र बरकडे यांना ही उमेदवारी द्यावी, असं राज्य ओबीसी सेलच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी किमान नऊ जागा या ओबीसी समाजासाठी देण्यात याव्यात अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

काँग्रेसचे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी नुकतीच निरा येथील शिवशक्ती पतसंस्थेच्या कार्यालय मध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करून याबाबतची माहिती माध्यमांना दिली आहे. यावेळी ते म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाच मोठे प्राबल्य आहे. खा.सुप्रिया यांच्या विरोधात लढताना धनगर नेते महादेव जानकर यांनी मोठे मतदान मिळवलं होतं. आयात केलेल्या या उमेदवाराला ओबीसी समाजाने मोठा पाठिंबा दिला होता. बाहेरून येणाऱ्या ओबिसी उमेदवारास लोकांनी मोठा पाठिंबा दिला. हीच संधी स्थानिक मतदारसंघात काम करणाऱ्या उमेदवाराला मिळाली तर बारामती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा एक खासदार होऊ शकतो, याचाच विचार करून राज्याच्या ओबीसी वतीने ही मागणी करण्यात आली आहे.

आपण गेली अनेक वर्ष राजकारणात सक्रिय आहोत. ग्रामपंचायती पासून आपल्या कामाला सुरुवात झाली असून पक्षाच्या ओबीसीच्या जिल्हा अध्यक्ष पर्यंत आपण काम केले आहे. या देशामध्ये लोकशाही आहे आणि अनेक घराण्यांनी देशांमध्ये काही चौकटी घालून दिलेले आहेत. या चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करने गरजेच आहे . एखादा मतदारसंघ म्हटलं की एखाद्याचं नेत्याच नाव घेतलं जातं, ही चौकट आता आपल्याला मोडायची आहे. देशातील सर्वसामान्य माणूस देखील संसदेत जायला हवा. त्यानेही आपण संसदेत जाऊ शकतो असा विचार करायला हवा. राजकारण ही काही कोणाची मक्तेदारी नाही. सर्वसामान्य माणूस लोकसभेमध्ये गेला तर तो सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मांडले. एखादा व्यापारी, व्यवसायिक, उद्योगपती, भांडवलदार जर लोकसभेत गेला तर तो व्यापारी हा व्यवसायीक, उद्योगपती आणि भांडवलदारांचे हित पाहणारा विचार लोकसभेत मांडेल. मग एखादा शेतकरी ओबीसी लोकांचे प्रतिनिधित्व करणारा प्रतिनिधी लोकसभेत गेला तर तो त्यांचा हिताचं रक्षण करण्यासाठी त्या पद्धतीचे विचार लोकसभेत मांडेल, कायदे बनवेल. म्हणून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला लोकसभेचे तिकीट मिळाव म्हणून ओबीसी सेलने शिफारस केली असेल तर यात गैर काय? संधी मिळाली तर आम्ही सुद्धा चांगलं काम करू शकतो असेही राजेंद्र बरकडे यावेळी म्हणाले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा