लडाख, २५ ऑगस्ट २०२३ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी लडाखमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, ‘मी तुम्हाला मी खात्री देतो की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आम्ही भाजपचा पराभव करु.’ तसेच मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसचा विजय होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे सध्या लडाखच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान ते वेगवेगळ्या लोकांशी संवाद साधत आहे. आज त्यांच्या दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे. त्यांनी कारगिलमध्ये रॅलीला संबोधित केले. भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या तणावाबाबत राहुल म्हणाले, चीनने आमच्याकडून हजारो किलोमीटर जमीन हिसकावून घेतली आहे, मात्र पंतप्रधान यावर खोटे बोलले. एक इंचही जमीन गेली नसल्याचे ते सांगत आहेत. हे पूर्णपणे खोटे आहे. तसेच जर भाजपने अगदी कोणावरही कोणत्याही प्रकारचा दबाव न आणता निवडणुका लढवल्या असत्या तर त्यांचा नक्कीच पराभव झाला असता, असा दावा देखील राहुल गांधी यांनी केला आहे. त्यामुळे २०२४ मध्ये काँग्रेस आणि इंडिया आघाडी भाजपचा पराभव करणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
राहुल गांधी हे १७ आणि १८ ऑगस्ट अशा दोन दिवसांच्या लडाखच्या दौऱ्यावर गेले होते. पंरतु १८ ऑगस्ट रोजी त्यांचा दौरा हा २५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. राहुल गांधी यांनी यावेळी लडाखच्या लोकांमध्ये त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कारगिलमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
राहुल गांधी १७ ऑगस्टला लडाखला पोहोचले त्यांनी अनेक ठिकाणी बाईक रायडींग केली. या दौऱ्यात राहुल यांनी सुमारे ८०० किलोमीटर बाइक चालवली. १९ ऑगस्ट रोजी त्यांनी लेह ते पँगाँग लेकपर्यंत २२४ किमी बाईक चालवली. यानंतर २१ ऑगस्टला २६४ किमीचा प्रवास करत ते पँगाँगवरून खार्दुंग ला इथे पोहोचले. त्याच दिवशी खार्दुंग पासून ४० किमी लेह ला गेले. २२ ऑगस्ट रोजी त्यांनी लेह ते लामायुरूपर्यंत १३६ किमीचा प्रवास बाईकवरून केला. कारगिलमधील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे