मुंबई, ५ ऑक्टोंबर २०२०: आज मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदाची आणि शिक्षण समितीच्या नियुक्तीबाबत निवडणूक होणार आहे. याबाबत भाजपनं असं सांगितलं होतं की, काँग्रेस शिवसेनेच्या विरोधात जाऊ शकते. मात्र, यावर अनिल परब यांनी असं म्हटलं होतं की, शिवसेनेला काँग्रेसकडून कोणताही धोका असणार आहे. ज्याप्रमाणं शिवसेना आणि काँग्रेसचे राज्यात आघाडी सरकार आहे त्याप्रमाणात मुंबई महानगरपालिकेत देखील काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये ताळमेळ राहणार आहे. अनिल परब यांनी मांडलेलं आपलं मत खरं ठरत आहे. कारण, काँग्रेसनं मुंबई महापालिकेतील समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला दिलेला शब्द पाळलाय. मुंबई महापालिका शिक्षण समितीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारानं अर्ज मागं घेतला असून स्थायीच्या निवडणुकीतही काँग्रेस माघार घेणार आहे.
शिवसेना आणि काँग्रेसची मुंबई महानगरपालिकेतील छुपी युती समोर आली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या वर्चस्वाला मुंबई महानगरपालिकेत धोका निर्माण करू इच्छित पाहणाऱ्या भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. राज्यातील महाविकास आघाडीत वितुष्ट नको म्हणून काँग्रेसने आज महापालिकेतील शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारीचा अर्ज मागे घेतला. स्थायी समितीतही हेच चित्र राहणार आहे.
जर निवडणुकीदरम्यान काँग्रेसला शिवसेनेला पाठिंबा दिला नसता तर भाजपनं काँग्रेसला पाठिंबा देऊन मुंबई महानगरपालिकेतील शिवसेनेच्या वर्चस्वाला धोका निर्माण केला असता. पण, आता काँग्रेस या दोन्ही निवडणुकांमधून मागं होत आहे. मतदानाच्या वेळी काँग्रेस तटस्थ राहील, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्ष शिवसेनेला मतदान करणार आहेत.
शिक्षण समितीसाठी शिवसेनेकडून संध्या दोषी तर काँग्रेसकडून संगीता हंडोरे आणि भाजपकडून सुरेखा पाटील रिंगणात होत्या. स्थायी समितीसाठी भाजपकडून मकरंद नार्वेकर, शिवसेनेकडून यशवंत जाधव आणि काँग्रेसकडून आसिफ झकेरिया मैदानात उतरले. आता शिक्षण समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या संध्या दोषी, तर स्थायी समितीच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे यशवंत जाधव निश्चित आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे