कर्नाटक आणि केरळच्या राजकारणात खळबळ माजली होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार आणि शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. त्या आता थांबल्या असल्या, तरी या चर्चा का सुरू झाल्या आणि त्यावर काँग्रेसने काय उपाय शोधला, याचा विचार करण्याची आवश्यकता आहे.
काँग्रेसच्या दक्षिणेतील राजकीय वातावरण तापवण्यासाठी भाजप मोठ्या चेहऱ्यांच्या शोधात आहे. कर्नाटकात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्री होण्याचा मानस आणि थरूर यांची पक्षात होणारी उपेक्षा यामुळे ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा सुरू झाली होती. कर्नाटकात भाजपला शिवकुमार यांच्यासारख्या संघटनकुशल नेत्याची गरज आहे; परंतु भाजपचे स्थानिक नेते त्यांना येऊ देतील का, हा प्रश्नच होता; शिवाय शिवकुमार मुख्यमंत्रिपद न मिळाल्याने नाराज असले, तरी त्यांचे काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्यांशी चांगले संबंध आहे. अपरिहार्यता म्हणून सध्या सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ पक्षश्रेष्ठींवर आली असली, तरी शिवकुमार यांना काँग्रेसमध्ये राहूनच मुख्यमंत्रिपदाची संधी मिळू शकते, ती भाजपत जाऊन मिळेल, याची हमी नाही. भाजपत अगोदरच मुख्यमंत्रिपदाच्या दावेदारांची संख्या भरपूर आहे. शिवकुमार काँग्रेसचे संकटमोचक मानले जातात. त्यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नक्कीच आहे. पक्षश्रेष्ठींनी त्यांना आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतर पक्षाला बहुमत मिळाल्यावर मुख्यमंत्रिपदाच्या निवडीला विलंब झाला. सिद्धरामय्या आणि शिवकुमार हे दोघेही प्रबळ दावेदार होते. तेव्हा पक्षश्रेष्ठींनी या दोघांकडे अडीच अडीच वर्षांसाठी पद देऊन संकट दूर केल्याचे सांगितले जाते. त्यानंतर शिवकुमार यांचे समाधान करण्यासाठी त्यांना पक्षाध्यक्षपदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर शिवकुमार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात या चर्चेला काही अर्थ नाही. प्रयागराज येथील संगमात स्नान केल्यानंतर त्यांनी महाकुंभाच्या व्यवस्थेचे कौतुक केले. ‘ईशा फाऊंडेशन’च्या जग्गी वासुदेव यांच्या दुसऱ्या कार्यक्रमात ते अमित शाह यांच्यासोबत उपस्थित होते. भाजप राजकारणात ‘अशक्य काहीच नाही’असे सांगत असताना काँग्रेसचा एक गट याकडे सिद्धरामय्या यांच्यावर दबाव आणण्याची रणनीती म्हणून पाहत आहे. शिवकुमार यांनीही चर्चेचे खंडन न करून गूढ निर्माण केले आहे. काँग्रेसमध्ये सध्या काहीही होऊ शकते, असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. केरळमधील तिरुअनंतपूरम मतदारसंघातून चौथ्यांदा लोकसभेवर निवडून आलेले थरूर यांची काही मते काँग्रेसला रुचली नाहीत, हे खरे आहे. त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या इच्छेविरुद्ध पक्षाध्यक्षपदाची निवडणूक लढवून हे अंतर वाढवले. केरळमध्ये प्रभावशाली नेत्यांची कमतरता असल्याने भाजप त्यांच्याभोवती जाळे टाकत आहे. काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या आणि आसाममधील भाजप सरकारचे शिल्पकार बनलेल्या हिमंता विश्व सर्मा यांच्यासारखी त्यांच्यामध्ये सत्तांतर करण्याची क्षमता असल्याचे भाजपला वाटते. थरूर यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत त्यांचे छायाचित्र शेअर केले आहे; परंतु त्यांनी पक्ष सोडत नसल्याचेही स्पष्ट केले आहे. पक्षात कोणत्याही प्रकारची भूमिका न मिळणे ही त्यांची व्यथा आहे. इतकेच काय, ज्या राज्यात काँग्रेसला स्वत:कडून मोठ्या आशा आहेत, तिथे पक्षाने त्यांच्यावर कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपवली नाही.
पुढील वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. याआधी थरूर ज्या पद्धतीने प्रश्न उपस्थित करत होते, त्यामुळे काँग्रेस नेतृत्वालाही धक्का बसला होता. त्यानंतर थरूर यांच्याशी तातडीने चर्चा करण्यात आली आणि परिस्थिती नियंत्रणात आली. काँग्रेस पक्षश्रेष्ठींना ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यात यश आल्याचे मानले जात आहे. थरूर यांनी पक्ष संघटनेबाबत काही मते मांडली आहेत. ते म्हणाले होते, की येथे संघटनेवर काम करणे महत्त्वाचे आहे. त्यांचा संघटनेच्या ताकदीवर भर आहे. दक्षिण भारतात पक्षाची कामगिरी चांगली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेसच्या पराभवाची अनेक कारणे त्यांनी सांगितली. ते म्हणाले, की प्रत्येक राज्यातील राजकीय इतिहास वेगळा असतो, राजकीय स्वरूप वेगळे असते. दक्षिण भारतात भाजपला यश मिळत नाही; परंतु ते उत्तर भारतात मिळते. काँग्रेस कुठेही चुकत नाही. प्रत्येक राज्यात आमची उपस्थिती आहे. एखाद्या राज्यात आपण तीन वेळा निवडणूक हरलो, तर त्याचा अर्थ तिथे परत येणे सोपे नाही. तुम्ही तीन वेळा हरलात, तर लोक इतर पर्याय पाहतात. हे मोठे आव्हान आहे. आपल्या देशात अशी राज्ये आहेत जिथे आपण युती करूनच पुढे जाऊ शकतो, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले होते. अरविंद केजरीवाल यांच्यांशी युती न करण्याच्या निर्णयाबाबत त्यांचे हे मत होते. उत्तर प्रदेशात एकेकाळी काँग्रेसचे सरकार होते; पण आता आघाडी करून पुढे जाण्याशिवाय पर्याय नाही. थरूर यांनी बिहार आणि पश्चिम बंगालचाही उल्लेख केला. ते म्हणाले, की आम्हाला विविध राज्यांमध्ये आमचे धोरणात्मक नियोजन करावे लागेल. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीमुळे लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. विरोधकांच्या केंद्र सरकारच्या वृत्तीवरही थरूर यांनी प्रतिक्रिया दिली. आम्ही विरोधात आहोत, याचा अर्थ सरकारच्या प्रत्येक निर्णयाला विरोध करायचा नाही. विकासाचा विचार केला पाहिजे, जनतेच्या हिताचा विचार केला पाहिजे. हा माझा विचार आहे, असे सांगताना त्यांची टीका राहुल गांधी यांच्यावरच होती. काँग्रेसचे परराष्ट्र धोरण नसावे आणि भाजपचेही परराष्ट्र धोरण नसावे, तर ते देशाचे परराष्ट्र धोरण असावे, या त्यांच्या मताशी कुणीही सहमत होईल. असा विचार मांडणाऱ्या थरूर यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराज असल्याचे नाकारले.
थरूर यांनी २००९ मध्ये संयुक्त राष्ट्राची नोकरी सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून ते केरळच्या तिरुअनंतपूरम मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेचे खासदार आहेत. ‘जर काँग्रेसला माझ्या सेवेची गरज नसेल, तर माझ्याकडे इतर अनेक पर्याय आहेत.’ या त्यांच्या विधानांवरून गदारोळ माजला. … त्यावर त्यांचे म्हणणे होते, की आजच्या जमान्यात जेव्हा प्रसारमाध्यमांचा गोंगाट आहे, तेव्हा एखादे ट्वीट किंवा २० सेकंदांचे मोडले तोडलेले विधानही मोठा वाद निर्माण करू शकते. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक थरूर राजकारणाबाहेरील त्यांच्या पर्यायांवर चर्चा करतात. पुस्तके लिहिणे, व्याख्यान देणे आणि बरेच काही; पण लगेचच अफवा पसरल्या, की आणखी एक काँग्रेस नेता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहे. कदाचित ते केरळच्या मुख्यमंत्रिपदासाठी स्वत:ला योग्य उमेदवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करीत होते. अलिकडच्या वर्षांत अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी पक्ष सोडला आहे आणि त्यापैकी बहुतांश भाजप किंवा त्यांच्या मित्रपक्षांमध्ये सामील झाले आहेत. ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद आणि मिलिंद देवरा यांसारख्या नेत्यांनीही पक्ष सोडला. त्यांना गांधी घराण्याचे जवळचे मानले जाते. त्याचवेळी हिमंता बिस्वा सरमा आणि कॅ. अमरिंदर सिंग या ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणामुळे निराश होऊन पक्ष सोडला. कमकुवत नेतृत्वामुळे पक्ष आता बुडत चालला आहे असे वाटल्याने त्यांनी काँग्रेस सोडली. या नेत्यांच्या मांदियाळीत थरूर बसत नाहीत. काँग्रेसच्या पारंपरिक नेत्याच्या प्रतिमेत ते बसत नाहीत. ते कोणत्याही राजकीय घराण्यातून आलेले नाहीत. गांधी घराण्याशी ते जवळचे नाहीत किंवा त्यांनी पक्षाच्या अंतर्गत रचनेत स्थान निर्माण करण्याचा प्रयत्नही केला नाही. ते वेगळ्या प्रकारचे नेते आहेत एक सुशिक्षित, मेहनती आणि सक्षम व्यक्ती. थरूर यांनी पहिल्यांदा राजकारणात प्रवेश केला, तेव्हा लोक त्यांच्यावर हसले. केवळ महत्त्वाकांक्षेपोटी राजकारणात उतरलेल्या आणि लवकरच अपयशी ठरलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्याचे इंग्रजी, त्याचे उच्चार, त्याचे वैयक्तिक आयुष्य – सर्वच गोष्टींवर चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदा त्यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल टोमणा मारला होता. सर्व टीका आणि वादांना न जुमानता थरूर सलग चार वेळा तिरुअनंतपूरममधून खासदार म्हणून निवडून येत आहेत. ही काही छोटी उपलब्धी नाही. तिथे डावे मजबूत स्थितीत असताना आणि भाजपही आपली पकड प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची पकड मजबूत आहे. २०२२ मध्ये त्यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. त्या निवडणुकीत पक्षाच्या अनेक नेत्यांनी उघडपणे त्यांच्या विरोधात काम केले. अनेक कार्यकर्त्यांना त्यांच्यापासून अंतर ठेवण्यास सांगण्यात आले. असे असतानाही त्यांनी एक हजारांहून अधिक मते मिळवली, यावरून काँग्रेसमध्येही त्यांचे विशेष स्थान असल्याचे दिसून येते.
थरूर यांची सर्वात मोठी अडचण ही आहे, की त्यांना कोणत्याही विशिष्ट गटात राहता येत नाही. काँग्रेसच्या गटबाजीत अडकून पडण्यापेक्षा साहित्याच्या प्रांतात रमण्यात धन्यता मानणारे ते नेते आहेत. जी-२३ गटात त्यांचे नाव आले, तेव्हाही ते कोणत्याही बंडखोर नेत्यासारखे दिसत नव्हते. त्यांच्या स्वतंत्र विचारसरणीमुळे ते मोदी सरकारच्या कोणत्याही धोरणाचे, मग ते अर्थव्यवस्थाचे असो की परराष्ट्र धोरण; स्तुती करतात तेव्हा काँग्रेसमध्ये त्यांच्याबद्दल शंका घेतली जाऊ लागते. काँग्रेसमध्ये सध्या वातावरण असे आहे, की पक्षापेक्षा वेगळे मत असलेल्या कोणाकडेही लगेच संशयाने पाहिले जाते; पण कुठलाही लोकशाही पक्ष हा फक्त चाकोरीचा गट असू शकत नाही. दुर्दैवाने आज बहुतांश पक्षांची हीच अवस्था आहे. कदाचित त्यामुळेच काँग्रेसमधील काही नेत्यांसाठी थरूर हे सोपे लक्ष्य बनले आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसला ते आवडत नसले तरी सर्वसामान्य मतदारांमध्ये त्यांची लोकप्रियता चांगली आहे. विशेषत: काँग्रेसपासून दूर गेलेल्या शहरी मध्यमवर्गातील मतदारांना थरूर यांच्यासारख्या नेत्यामध्ये आशेचा किरण दिसतो. हे मतदार पूर्णपणे भाजपसोबत नाहीत आणि इतर कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. त्यांना केवळ सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षांचीच नव्हे, तर सकारात्मक आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची गरज आहे. थरूर हे कट्टर नेहरूवादी धर्मनिरपेक्ष नेते आहेत. ते भाजपच्या हिंदुत्वाच्या राजकारणाला विरोध करतात आणि अर्थव्यवस्थेबद्दल उदारमतवादी विचार करतात. अशा स्थितीत उजव्या आणि डाव्या विचारसरणीसाठी ते एक भक्कम वैचारिक उत्तर ठरू शकतात. कदाचित त्यामुळेच थरूर केरळमध्ये काँग्रेससाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. केरळमध्ये संघटित केडर-आधारित राजकारण खूप प्रभावी आहे. थरूर हे असंघटित पण विचारी मतदारांना आकर्षित करण्यासाठी योग्य चेहरा असू शकतात. केरळ हे कदाचित एकमेव राज्य आहे, जिथे आगामी निवडणुकीत काँग्रेसला एकट्याने जिंकण्याची संधी मिळू शकते. काँग्रेसमध्ये गटबाजी वाढत राहिली तर मुख्यमंत्रिपदाचे अनेक दावेदार पुढे येतील आणि पक्ष कमकुवत होऊ शकतो. अशा परिस्थितीत काँग्रेस नेतृत्व मोठा निर्णय घेऊन थरूर यांना केरळमध्ये पक्षाचा चेहरा बनवणार का, हा प्रश्नच आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, बागा वरखाडे