सचिन पायलट यांना काँग्रेसचा मोठा झटका

जयपुर, १४ जुलै २०२० : राजस्थानात गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नाट्य सुरु आहे. राजस्थानचे उप – मुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हे मुख्यमंत्री पद न मिळाल्याने नाराज होते. त्यामुळे त्यांनी आपल्याच सरकार आणि पक्षाविरुद्ध बंड पुकारत पक्षावर दबाव तंत्राचा वापर केला. काँग्रेसच्या बैठकीला ते हजर देखील राहिले नाही. सचिन पायलटच्या या सरकारविरोधी आणि पक्षाविरोधी भूमिकेमुळे आज त्यांना राजस्थानच्या उप मुख्यमंत्री पदावरून आणि राजस्थान काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. आता राजस्थान काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा हे असणार आहेत.

उपमुख्यमंत्री पदासह प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं,

सचिन पायलट यांच्यासह विश्वेंद्र सिंग आणि रमेश मीना यांची देखील मंत्री मंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक संपल्यानंतर सुरजेवाला म्हणाले, “उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि काही आमदार आणि मंत्री गोंधळून काँग्रेसचे सरकार पाडण्याच्या भाजपच्या कटात सामील झाल्याबद्दल आम्हाला खेद वाटतो.” पायलटविरूद्ध केलेल्या कारवाईची माहिती देताना सुरजेवाला यांनीही लहान वयातच सचिन पायलट यांना पक्षाने बरंच काही दिल्याचं म्हटलं.

दरम्यान सचिन पायलट यांनी याबद्दल अजून काही ठोस प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र त्यांनी आता ट्विटरवरील आपल्या प्रोफाईलमधून “राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष” ही ओळख हटवली आहे. तसेच ”सत्य को परेशान किया जा सकता है पराजित नहीं।” अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे. आता यापुढे सचिन पायलट काय भूमिका घेतात आणि त्याचा राजस्थानच्या राजकारणावर काय परिणाम होतो याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा