दिवाळी सुट्टीच्या कालावधीत भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सप्तशृंगी गडावर चोवीस तास दर्शनाची सुविधा

नाशिक, २७ ऑक्टोबर २०२२ : आद्य स्वयंभू शक्तीपीठ श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे दिवाळी उत्सव दरम्यान सालाबादप्रमाणे होणारी भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेवून विश्वस्त संस्थेने श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेचे मंदिर हे गुरुवार, २७ ऑक्टोबर पासून रविवार, १३ नोव्हेंबर पर्यंत दर्शनासाठी २४ तास खुले ठेवून भाविकांना श्री भगवती – श्री सप्तशृंगी मातेच्या दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत भाविकांनी २४ तास दर्शन व्यवस्था सुरू असेल, याची नोंद घेवून गर्दीचा कालावधी टाळून पर्यायी दर्शन सुविधेच्या उपलब्ध वेळेचा विचार करता आपल्या निर्धारित वेळेत श्री दर्शनासाठी येवून मंदिर व्यवस्थापनास योग्य ते सहकार्य करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

या सुट्टीच्या काळात महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश राज्यातून लाखोच्या संख्येने सप्तशृंगी गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. याच कालावधी दरम्यान राज्यातील तसेच परराज्यातील विविध शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असते, तसेच दरवर्षी दिवाळीत दर्शनासाठी येणाऱ्या पायी पालख्या, भाविक यांची संख्या विचारात घेता अचानक होणाऱ्या संभाव्य गर्दीची परिस्थिती टाळण्यासाठी, श्री भगवती मंदिर २४ तास भाविकांना दर्शनासाठी सुरू ठेवल्यास भक्तनिवास, सुरक्षा व इतर बाबींवर ताण पडणार नाही. भाविकांना आनंदाने श्री भगवती दर्शनाचा विशेष लाभ घेता येईल. या दृष्टीने सदरचा निर्णय विश्वस्त संस्थेने घेतला आहे.

आवश्यतेनुसार श्री भगवती मंदिरातील पर्यवेक्षक, सेवेकरी, सुरक्षा रक्षक, मदतनीस तसेच देणगी कार्यालय येथील कर्मचारी आदीसह आवश्यक मनुष्यबळाची उपलब्धता तसेच रोप वे ट्रॉली सुविधा देखील भाविकांसाठी सुरू असेल असे नियोजन करण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : गुरूराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा