मुंबई, 1 फेब्रुवारी 2022: परीक्षा ऑनलाइन घ्यावी या मागणीसाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आक्रमक झालेत. यावरून काल विद्यार्थ्यांनी अनेक ठिकाणी आंदोलनं केली. महत्त्वाचं म्हणजे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर झालेल्या आंदोलनानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. धारावीमध्ये शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केल्याचं समोर आलंय. विद्यार्थ्यांना भडकवण्या मागं हिंदुस्तानी भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे. यात आता पोलिसांच्या हाती आणखी एक महत्वपूर्ण व्हिडिओ लागलाय. त्यामुळं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरील आंदोलनामागं षडयंत्र असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केलाय.
या प्रकरणात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेलं आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडं मांडायला हवी होती, असं मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलं. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागं एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असं घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचं प्रतिपादन गृहमंत्र्यांनी कंले.
याविषयी पोलीस विभागाला आदेश देण्यात आले असून मागील दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का? याची शहानिशा करून, याचा पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री म्हणाले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री योग्य मार्ग काढतील. विद्यार्थ्यांच्या हिताची काळजी सरकारला आहे. यामध्ये सरकार निश्चितपणे मदत करण्याची भूमिका घेईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. काही तासांपूर्वी या आंदोलनामुले मोठा तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. यावेळी आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे