नवी दिल्ली, 15 ऑक्टोंबर 2021: पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि अनेक दहशतवादी संघटनांच्या नेत्यांमध्ये नुकतीच एक बैठक झाली आहे. पीओकेच्या मुझफ्फराबादमध्ये ही बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत भारत आणि जम्मू -काश्मीर कसे हादरले जाऊ शकतात, यावर चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 सप्टेंबर रोजी आयएसआय अधिकारी आणि दहशतवादी संघटनांमध्ये ही अत्यंत गोपनीय बैठक झाली. भारतीय गुप्तचर संस्थांनीही या बैठकीसंदर्भात अलर्ट जारी केला आहे.
जम्मू -काश्मीरमध्ये हल्ल्याचा कट
आयएसआय आणि दहशतवादी संघटना यांच्यात मुजफ्फराबादमध्ये झालेल्या बैठकीत जम्मू -काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी हल्ले करण्याची योजना बनवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काश्मीरमध्ये जास्तीत जास्त टार्गेट किलिंग केले जावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
टारगेट किलिंग आणि हल्ल्यांची जबाबदारी घेण्यासाठी नव्या नावाखाली दहशतवादी संघटना निर्माण केल्या जात आहेत. या संघटना हल्ल्यांची जबाबदारी घेऊन तपास यंत्रणांची दिशाभूल करतील. बैठकीत निर्णय घेण्यात आला की पोलीस, सुरक्षा दलांसोबत काम करणारे, गुप्तचर खात्यांमध्ये काम करणारे काश्मिरींना ठार मारण्यात येणार आहे.
आयएसआयने यादी तयार केली
या व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी नसलेल्या लोकांना, भाजपा-संघाशी संबंधित लोकांना लक्ष्य करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. आयएसआयने सुरुवातीच्या 200 लोकांची हिट-लिस्टही बनवली आहे, ज्यांच्या हत्येचा प्रयत्न केला जाईल, त्यात अनेक काश्मिरी पंडितांची नावेही आहेत.
जे दहशतवादी अद्याप सुरक्षा दलांच्या नजरेत नाहीत ते हत्यांसाठी वापरले जातील, यासाठी मोठ्या संख्येने काश्मिरी जे दहशतवाद्यांचे सहानुभूतीदार आहेत, परंतु दीर्घकाळापासून कोणत्याही गुन्ह्यात गुंतलेले नाहीत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे