नाशिक, २ जून २०२३ : नाशिक जिल्ह्यातील खामखेडा येथील शेतकरी समाधान आहेर यांनी २ एकरामध्ये २ लाख रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड केली होती. परंतु बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव बाजार भाव मिळू लागल्याने उद्विग्न होऊन आहेर यांनी टोमॅटोच्या पिकात मेंढ्या आणि जनावरे चारायला सोडली आहेत.
उन्हामुळे टोमॅटोचे फळ लवकर परिपक्व होत असल्यामूळे बाजारात आवक वाढली आहे. परंतु मागणी कमी आणि बाहेरील व्यापारी कमी येत असल्याने बाजारभाव गडगडले आहेत. टोमॅटो तोडून विकण्याला देखील मजुरीसाठी घरातून पैसे द्यावे लागत आहेत. त्यामुळे कांद्यानंतर आता टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. टोमॅटोला सध्या कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. तोडणी केलेला माल बाजारात घेऊन जाण्यासाठी सुद्धा परवडत नसल्याने शेतकऱ्याने उद्विग्न होऊन टोमॅटोच्या उभ्या पिकात मेंढ्या चरायला सोडल्या आहेत.
नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. बाजारात सतत कांद्याचे भाव घसरत असल्या मुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून नाशिक जिल्ह्यात नाफेडमार्फत कांदा खरेदीला सुरवात करण्यात आली आहे. देवळा तालुक्यात उमराणे बाजार समितीत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या हस्ते औपचारिकरित्या कांदा खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कांद्याला प्रति क्विंटल ११५६ रुपये इतका भाव मिळाल आहे.
नाशिक जिल्ह्यात १४ फेडरेशन आणि नोंदणीकृत फार्मर प्रोड्यूसर कंपन्यांमार्फत कांदा खरेदी केली जाणार आहे. त्याचबरोबर नाशिक प्रमाणे पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, अहमदनगर या जिल्ह्यांतही प्रत्यक्ष कांदा खरेदी केला जाणार असल्याचे मंत्री भारती पवार यांनी जाहीर केले आहे. राज्यात कांद्याबरोबरच इतर पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. आता सरकार याकडे कसे पाहते याकडे शेतकरी वर्ग डोळे लावून बसला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर