जळगाव १२ जुलै २०२४ : जळगाव मधील पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने कालपासून पाचोरा ते खडकदेवळा रस्त्यावर वृक्षारोपणाला सुरवात झालीय. सारोळा खुर्द येथे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे दोन हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आलाय. विशेष म्हणजे वृक्ष लागवड करतांना वृक्षारोपण बरोबरच त्यांचे सुरक्षेसाठी तारेचे ट्रि गार्ड देखील लावण्यात येत असल्याने वृक्षांचे संवर्धन होणार असुन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सफल होईल अशी उपाययोजना करण्यात आलीय.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता डि.एम.पाटिल, शाखा अभियंता श्रीनिवास काजवे, गणेश भघुळे, प्रियंका घोरपडे, सर्व शाखा अभियंता व कर्मचारी आदी उपस्थित होते.
पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागातील सर्व अभियंते व कर्मचारी यांनी वृक्षारोपणासाठी १० ते १२ फूट उंचीच्या झाडांची निवड केली असून यामध्ये प्रामुख्याने वड, कडुलिंब या वृक्षांची लागवड करुन शाश्वत आणि हरित पर्यावरण करण्याचा संकल्प केला आहे. यामुळे परिसर सुशोभीकरण, हवेच्या गुणवत्तेत सुधारणा, जैवविविधता संवर्धन आणि हवामान बदलाचे परिणामावर उपाययोजना यासारखे पर्यावरणीय फायदे होण्यास मदत होणार आहे.
-मागील वर्षीची वृक्ष आज डोलू लागली
पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागातर्फे दोन वर्षांपूर्वी पाचोरा ते आर्वे फाटा, लोहारी, वरखेडी, पाचोरा ते वाडी, सातगाव डोंगरी रस्त्यांच्या दुतर्फा सुमारे एक हजार रोपांची लागवड केली होती. ही रोपे आज डोलू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रोपांची सुरवातीपासूनच काळजी घेतल्यामुळे सर्वच रोपांची चांगली वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे व कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे यांच्या संकल्पनेतून निंबोळ्या घेऊन शेणखत व मातीच्या मिश्रणाचे चेंडू तयार करून ते काटेरी झुडपांमध्ये तळाला टाकले जात आहेत. या ‘सीडबॉल’ उपक्रमात कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
-नैसर्गिक रित्या वाढलेल्या झाडांच्या संवर्धनासाठी सरसावलं बांधकाम उपविभाग
सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीतील नैसर्गिक रित्या वाढलेल्या झाडांना देखील पाचोरा सार्वजनिक बांधकाम उपविभागाने त्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना तारेचे ट्रि गार्ड लावले आहेत. त्यामुळे या वृक्षांचे संवर्धन होणार असून पाचोरा तालुक्यातील अनेक गावांच्या दोन्ही रस्त्यांच्या बाजूला नैसर्गिकरीत्या वृक्ष जगली आहे त्यांचे संवर्धन राखण्याची जबाबदारी आता पाचोरा बांधकाम उपविभागाने घेतली आहे. त्या दृष्टीने उपाययोजना करण्याचे काम प्रगतीपथावर दिसुन येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : आत्माराम गायकवाड