नीरा येथील बहुचर्चित प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात

नीरा, दि. १७ जून २०२०: नीरा येथील प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोन या प्राथमिक शाळेच्या इमारतीचा बांधकामाचा शुभारंभ पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे व आरोग्य व बांधकाम सभापती प्रमोद काकडे यांच्या हस्ते आज करण्यात आला. सुमारे दीड कोटी खर्च करून शाळेच्या सात वर्गखोल्या येथे बांधण्यात येणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील पट संख्येने मोठ्या असलेल्या काही मोजक्याच प्राथमिक शाळांमध्ये समावेश असलेली नीरेतील प्राथमिक शाळा क्रमांक एक व दोनची इमारत अनेक वर्षापासून मोडकळीस आली होती. ही मोडकळीस आलेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात यावी याबाबतची मागणी पालकांनी बऱ्याच वर्षांपासून लावून धरली होती. अनेक वेळा यासाठी आंदोलने करण्यात आली. पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे ही बंद केले होते. पालकांच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनाला यश आले असून आज या शाळेची नवीन इमारत बांधण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

जुनी इमारत पाडून नवीन इमारत बांधत असताना तेथील शाळेसाठी बावीस वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. मात्र पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यावेळी दीड कोटी रुपयांचा निधी दिला होता. यामध्ये बावीस वर्गखोल्या बांधणे अपेक्षित होते. मात्र येथील जागा व शाळेसाठी आवश्यक असलेली वर्गखोल्या त्यांचा विचार करता यामध्ये केवळ सातच वर्गखोल्या बसू शकतात. त्यामुळे सध्यातरी तेवढ्या खोल्यांचे बांधकामाला सुरुवात करावी आणखी वर्ग खोल्यासाठी वाढीव निधी दिला जाईल असे म्हणत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बांधकाम सुरू करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार आज या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जीप सदस्य शालिनी पवार, पुरंदर पंचायत समितीचे उपसभापती प्रा.डॉ.गोरखनाथ माने, माजी सभापती अतुल म्हके शिक्षणाधिकारी प्राथमिक सुनील कुराडे, गटविकास अधिकारी मिलिंद टोणपे, गटशिक्षणाधिकारी गायकवाड, उपअभियंता मखरे, नीरेच्या सरपंच दिव्या पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, शाखा अभियंता केंद्रप्रमुख शिक्षक व इतर मान्यवर तसेच स्थानिक लोक प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थितीत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा