धायरी, पुणे १० जुलै २०२३: मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर, पुण्यातील धायरी येथील भुमकर पुलांवर भरधाव वेगाने कोळसा घेऊन जाणारा कंटेनर पलटी झाला. हा अपघात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडला आहे. या अपघातामुळे महामार्गावर कोळशाचे ढीग लागल्याने सातारा बाजूकडे जाणारी वाहतूक पुर्णपणे बंद झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा कंटेनर कात्रज नवीन बोगद्याच्या बाजुने वारजेकडे भरधाव वेगाने जात होता. पुढे हा कंटेनर अचानक भुमकर पुलांवर रस्त्याचे दुभाजक तोडून, दुसऱ्या दोन कंटेनरला धडकला. तसेच विजेचा पोल पाडून दुसऱ्या लेनवर जाऊन पलटी झाला. या अपघातात कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती समजताच सिंहगड अग्निशमन दल, सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, जयंत राजूरकर, राहुल यादव, प्रविण जाधव. वाहतूक शाखेचे पांडुरंग वाघमारे, प्रशांत कणसे, अग्निशमन दलाचे प्रभाकर उम्राटकर इत्यादी त्वरित घटनास्थळी दाखल झाले आहेत. रस्त्यावरील कोळसा आणि वाहन बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर