नाशिक जिल्हा रुग्णालयातच दूषित पाणीपुरवठा ; रुग्णांसह नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

6

नाशिक, १४ एप्रिल २०२३: जिल्हा रुग्णालयातील पाणी दूषित असल्याचे राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या पाहणीतून समोर आले आहे. त्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातलगांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आरोग्य विभागाने उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा रुग्णालयीन प्रशासनाला केल्या आहेत.

राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेने फेब्रुवारी महिन्यात जिल्हा रुग्णालयातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. पाण्याची तपासणी केली असता, त्यात २० टक्के पाणी नमुने दूषित आढळल्याची गंभीर बाब समोर आली. दूषित पाण्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातलगांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याने प्रयोगशाळा उपसंचालक मनोहर धूम यांनी मार्च महिन्यात जिल्हा शल्यचिकित्सकांना उपाययोजना करण्यास सांगितले होते.

रुग्णालयातील रुग्ण व नातलग रुग्णालयाच्या आवारातीलच जलकुंभाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. मात्र या जलकुंभाची नियमित साफसफाई होत नसल्याची गंभीर बाब या तपासणीतून समोर आली होती. त्यामुळे जलकुंभाची तातडीने साफसफाई करून सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाकडून सूचनांचे पालन न केल्यास दूषित पाण्यामुळे साथरोगाचा फैलाव झाल्यास त्याची जबाबदारी जिल्हा रुग्णालयाचीच असेल, अशीही तंबी उपसंचालक धूम यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा