नवी दिल्ली, ७ ऑगस्ट २०२३ : केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह ६ ऑगस्ट रोजी पुणे जिल्ह्यात केंद्रीय सहकार संस्थेने निर्माण केलेल्या केंद्रीय निबंधक सहकारी संस्था (CRCS) कार्यालय या पोर्टलचे अनावरण करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला असे विधान अमित शाह यांनी केल आहे, तर यावर आत्ता संजय राऊतांनी आज टीकास्र सोडलं. संजय राऊत आज दिल्लीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते.
२०२४ च्या निवडणुकीनंतरही अजितदादांचं कौतुक कायम ठेवा, असं संजय राऊत म्हणाले. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनाच सोबत घेतलं. मांडीला मांडी लावत सरकारमध्ये बसवलं, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला आहे. तसेच दादा योग्य जागी आहेत असं अमित शाह म्हणाले. हे २०२४ नंतरही बोला. दादा नक्की कुठे आहेत? या राज्याचं आणि देशाचं राजकारण ज्या पद्धतीने सुरू आहे, त्यानुसार योग्य आणि अयोग्य याच्या व्याख्या कोणी ठरवू नयेत अशी टीका संजय राऊतांनी केली. कालपर्यंत जे भ्रष्टाचारी होते, नॅचरल करप्ट पार्टी होते, ७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा, या सिंचन घोटाळ्याचा नेता अजित पवार असं अमित शाह बोलत होते. आज ते योग्य जागी आहेत, असा उपहासात्मक टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
मणिपूरमधील हिंसाचारावरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तिथं सरकार आहे की नाही? असा प्रश्न सगळे विचारत आहेत. तिथे परिस्थिती गंभीर आहे, मणिपूरचं सरकार बरखास्त व्हायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. इतर राज्यात अशाप्रकारचा हिंसाचार घडला असता तर या भाजपाने राष्ट्रपतींना सांगून तिथे राष्ट्रपती राजवट लावली असती. पण मणिपूरमध्ये त्यांचं भूमिगत राजकारण सुरू आहे. ईशान्येकडे अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. मणिपूरच्या दंगलीमध्ये चीनचा हात आहे, हे समोर आलं आहे. तरीही पंतप्रधान त्यांची चुप्पी तोडत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार देशाला करावा लागेल असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे