पुरंदर, दि.२४ जुलै २०२० :पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या पाच दिवसापासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे या भागात उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकासानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मात्र शासनाकडून अद्याप तसे आदेश आले नसल्याचे म्हणत प्रशासनाकडून पंचनामे करण्यास नकार देण्यात येत आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, रीस, पिसे, पोंढे, नायगाव,पिंपरी,मावडी,व परिसरात गेल्या पाच दिवसापासून सतत पाऊस पडतो आहे. यामुळे शेतामध्ये तळ्याचे स्वरूप आले आहे. या भागातील शेतकऱ्यांनी बाजरी, वांगी, टोमॅटो, कारली, भुईमुग, वाटाणा, कोथिंबीर,मेथी,पपई, गवार, मूग,आदी पिके घेतली आहेत. पिकेही जोमदार आली आहेत. येथील शेतकऱ्यांनी दाग – दागिने मोडून,कर्ज काढून व उसने पैसे गोळा करून ही पिके जगवली आहेत.परंतु गेल्या पाच दिवसांपासून या परिसरात सतत चाललेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाण्याची तळी तयार झाली आहेत. परिणामी सगळी उभी पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे कर्ज काढलेले पैसे परत करणे तर दूर, परंतु खाण्यापिण्याची गंभीर समस्या सर्व शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहे.
यापूर्वी कोरोना संकटामुळे शेतात उत्पादित केलेला माल मार्केट बंद असल्यामुळे शेतातच फेकून द्यावा लागला आहे. आणि आता पुन्हा अती पावसामुळे उभी पिके पाण्यात सडून जात आहेत. अशा परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राजुरी येथील शेतकरी राहुल गायकवाड,मारुती गायकवाड,सागर चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान शासनाकडून अद्याप अशाप्रकारच्या सूचना आम्हाला आल्या नाहीत. त्या आल्या तर आम्ही तातडीने पंचनामे करू.मात्र या दरम्यान कोणाच्या घराचे नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे केले जातील असे पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी म्हटले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे.