नाशिक, १३ ऑक्टोंबर २०२३ : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत ८३६ कला, क्रीडा व संगणक शिक्षकांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी शिक्षक कृती समितीच्या वतीने आदिवासी विकास आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आला. मात्र, पोलिसांची परवानगी न मिळाल्याने आंदोलकांनी ईदगाह मैदानावर ठिय्या आंदोलन केले.
या वेळी आदिवासी आयुक्तालय प्रशासनाने आंदोलनकर्त्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. यामध्ये प्रशासनासह आंदोलकांनी आदिवासी विकास मंत्र्यांना १० दिवसांचा ‘अल्टीमेटम’ दिला. या मुदतीत प्रश्न न सुटल्यास आत्मदहन करण्याची धमकी दिली. अनेक वर्षांपासून कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षक मानधनावर काम करत होते, मात्र आता या पदांवर खासगी कंपन्यांमार्फत भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
नियुक्तीबाबत तारखेवर तारीख देण्याचे काम काही दिवसांपासून सुरू आहे. त्यामुळे कृती समितीच्या वतीने महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांतील आदिवासी विभागाच्या कंत्राटी कला, क्रीडा व संगणक शिक्षकांनी आक्रमक होत, शहरातील ईदगाह मैदानावर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात समिती सदस्य आकाश निकम, गणेश लभडे, भूषण सोनवणे, सागर सरोदे, राहुल कापडे, स्वप्नील गिते, संजय गुरगावड, शेळके आदी सहभागी झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड