“शूद्र ला शूद्र म्हटलं तर का वाईट वाटतं…” भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर यांचं विवादित वक्तव्य

नवी दिल्ली, १४ डिसेंबर २०२०: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना भाजपच्या खासदार प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या की, आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव त्यांना (ममता) डोळ्यासमोर दिसत आहे, त्यामुळं त्या निराश आणि हताश आहेत. त्या म्हणाल्या की, राज्यात आता त्यांची राजवट संपली आहे हे ममतांना कळलं आहे.

भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभा निवडणुका जिंकेल आणि पश्चिम बंगालमध्ये हिंदु राज स्थापन होईल. प्रज्ञा ठाकूर यांनी हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावरील प्रतिक्रियेत सांगितलं.

यापूर्वी त्या म्हणाल्या की “जर तुम्ही क्षत्रियला क्षत्रिय म्हटलं तर वाईट वाटत नाही, ब्राह्मणांना ब्राह्मण म्हटलं तर वाईट वाटत नाही. वैश्यला वैश्य म्हंटलं तर वाईट वाटत नाही. पण, शूद्र ला शूद्र म्हंटल्यावर काय वाईट वाटते. याचं कारण काय? कारण त्यांना हे समजत नाही.”

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे बोलवण्यात आलं आहे. जेपी नड्डा यांच्या सुरक्षेकडं दुर्लक्ष केल्यामुळं केंद्रीय गृह मंत्रालयानं शनिवारी ही कारवाई केली.

तृणमूल कॉंग्रेसनं (टीएमसी) गृह मंत्रालयाच्या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टीएमसीचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी गृहमंत्रालयावर पश्चिम बंगालच्या आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना दहशत दाखवल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर पाठविणं त्यांच्यावर दबाव आणणं ही गृहमंत्रालयाची रणनीती आहे. असं केल्यानं राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्याचवेळी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी भाजप नेत्यांवरील हल्ल्यासाठी ममता सरकारवर निशाणा साधला आहे. कैलाश विजयवर्गीय सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी भाजप नेत्यांवर विटांचा वर्षाव करीत आहेत.

काय आहे प्रकरण

जेपी नड्डा दोन दिवसांच्या दौऱ्यावर पश्चिम बंगालमध्ये होते. गुरुवारी जेपी नड्डा डायमंड हार्बरच्या दिशेनं जात होते, त्यावेळी त्यांच्या पथकावर दगडफेक केली आणि वाटेत हल्ला केला. या काळात जेपी नड्डा सुरक्षित होते, पण कैलास विजयवर्गीय यांना दुखापत झाली.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा