मराठा आरक्षणावरून वाद वाढला; कुणबी प्रमाणपत्रांवरून लक्ष्मण हाके यांचा सरकारवर आरोप

पुणे ६ मार्च २०२६: मराठा आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक काल मुंबई येथे पार पडली. या बैठकीनंतर उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी सापडल्याची माहिती दिली.

निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीने कामकाज सुरू केल्यापासून राज्यभरात तब्बल ४८ लाख कुणबी नोंदी सापडल्या असून त्याआधारे आतापर्यंत १२ लाख कुणबी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ५० हजार तर बीड जिल्ह्यात ३४ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. याप्रमाणे विविध जिल्ह्यांत एकूण १२ लाखांपेक्षा अधिक प्रमाणपत्रांचे वितरण झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

दरम्यान, या निर्णयावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यात सेटलमेंट झाल्याचा आरोप हाके यांनी केला. ही सेटलमेंट मुख्यमंत्री मान्य करतात का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्रे देण्याच्या प्रक्रियेमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले असून शासनाने प्रत्यक्षात ओबीसींचे आरक्षण संपवले असल्याचा आरोप हाके यांनी केला. पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, सांगली, परभणी आणि छत्रपती संभाजीनगरसारख्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण संपल्याचा दावा देखील त्यांनी केला.

मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी कुणबी प्रमाणपत्रे काढून आरक्षणाचा लाभ घेतल्याने ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत हाके यांनी सरकारवर टीका केली.

न्युज अनकट प्रतिनीधी: पूजा मालुसरे