टीईटी घोटाळ्यातील दोषींना दणका, ७ हजार ८७४ उमेदवारांना कायमची परीक्षा बंदी

पुणे, ०४ ऑगस्ट २०२२: टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात आता दोषींना मोठा धक्का बसला आहे. टीईटी परीक्षा घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नाही. टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

या सर्व उमेदवारांना बेकायदेशीर ठरवले आहे. संबंधित उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना या पुढील टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी बंदी घालण्यात आली आहे‌. आरोग्य भरती परीक्षेतील घोटाळ्याचा पुणे पोलिसांकडून तपास करण्यात येत असताना त्या तपासातून टीईटी घोटाळा उघड झाला होता. यात परीक्षा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, परीक्षा घेणाऱ्या खाजगी कंपनीचे संचालक आणि उमेदवारांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी म्हाडा पेपरफुटीचा सुत्रधार डॉ. प्रितीश देशमुख याच्या घराची झाडाझडती घेतली असता तेथे टीईटीचे ५० ओळखपत्र आढळून आले होते. टीईटीची परीक्षा २१ नोव्हेंबर रोजी झाली होती. या परीक्षांसाठी साडेचार लाख विद्यार्थीचे अर्ज आले होते. प्रश्नसूची आणि उत्तरसूचीमध्ये तफावत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे.

पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना चौकशीसाठी बोलावले. त्या नंतर अटक करण्यात आली होती. शिक्षक पात्रता परिक्षेत लाच घेऊन विद्यार्थीना पास केल्याचा ठपका सुपे यांच्यावर ठेवण्यात आला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा