गोल पोस्ट गुन्हा उत्तर प्रदेश मध्ये कोपर्डी सारखी घटना

उत्तर प्रदेश मध्ये कोपर्डी सारखी घटना

लखीमपूर, १६ ऑगस्ट २०२०: १३ जुलै २०१६ ही तारीख महाराष्ट्राच्या चांगलीच लक्षात राहिली आहे. कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी बलात्कार करून तिच्या शरीराची विटंबना केली होती. अगदी डोळे फोडण्यापासून ते गुडघ्याच्या वाट्या काढण्यापर्यंत मजल या नराधमांची गेली होती. त्याच घटनेशी मिळतीजुळती घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खारी मधील नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. इतकेच नव्हे तर बलात्कार करून त्या अल्पवयीन मुलीच्या शरीराची विटंबना देखील केली आहे.

ही अल्पवयीन मुलगी तेरा वर्षांची होती. शौचालयासाठी बाहेर पडलेल्या या मुलीला नराधमांनी पकडले, तिच्यावर बलात्कार केला बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून तिचे डोळे फोडण्यात आले. गळ्यात पट्टा बांधून तिला फरफटत नेण्यात आले. कोपर्डी नंतर पुन्हा अशी थरारक घटना उत्तर प्रदेश मध्ये पाहण्यास मिळाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी १४ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आपल्या घराबाहेर उसाच्या शेतात गेली होती. कुटुंबातील सदस्यांसाठी हे सामान्य होते, परंतु तिच्या पालकांना तेव्हा संशय आला जेव्हा मुलगी बराच काळ घरी आलीच नाही. यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. परंतु, तिचा कोठेच तपास न लागल्यामुळे अखेर त्यांनी स्थानिक पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवली.

तक्रार नोंदवल्यानंतर तिच्या घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये शोध सुरूच ठेवला होता. माध्यमांशी बोलताना त्या मुलीच्या पित्याने रडतरडत सर्व हकीकत सांगितली. ते म्हणाले की, “आम्ही शोध घेत उसाच्या शेतापर्यंत पोहोचलो होतो. तेथे आम्हाला आमच्या मुलीचा मृतदेह सापडला. तिच्यासोबत बलात्कार झाला होता व तिचा खून ही करण्यात आला होता. नराधमांनी तिचे डोळे काढले होते. तिच्या गळ्यात पट्टा लटकलेला होता. नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर तिची जीभ देखील त्यांनी कापली होती.” त्यांनी पुढे सांगितले की घटना झाली तेव्हा संशयित आरोपी येथेच उपस्थित होते. आम्ही जेव्हा घटनास्थळी पोहोचलो तेव्हा त्यांनी तिथून पळ काढला.

मुलीवर बलात्कार झाल्याचे मुलीच्या काकांनी सांगितले. जगदीश, संतोष आणि संजय या तीन तरुणांवर त्यांचा संशय आहे. पीडित मुलीच्या काकांनी सांगितले की, पीडित मुलगी शेतावर गेली होती जिथे तिला जगदीश, संतोष आणि संजय आढळले. मुलीवर बलात्कार केला गेलाय, त्यानंतर तिचे डोळे काढले आणि तिला मारण्यात आले.

या प्रकरणात लखीमपूर पोलिसांनी संतोष यादव आणि संजय गौतम नावाच्या दोन तरुणांविरूद्ध मुलीच्या कुटूंबाच्या विनंतीवरून आयपीसीच्या कलम ३०२ आणि २०१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्वरित कारवाई करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

आरोपींविरोधात एन.एस.ए.

या क्रूर बलात्कार प्रकरणातील आरोपींविरोधात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) लागू करण्यात येणार असल्याचे एसपी सतेंद्र कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, आरोपीची चौकशी चालू आहे आणि या घटनेत आणखीन कोणाचा समावेश आहे का याबाबत देखील तपास सुरु करण्यात आला आहे.

पोस्टमार्टममध्ये गँगरेप केल्याची पुष्टी

लखीमपूर खेरीचे एसपी सतेंद्र कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि शवविच्छेदन केले. मुलीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट १५ ऑगस्ट रोजी आला. पोस्टमॉर्टममध्ये सामूहिक बलात्काराची पुष्टी झाली आहे. दोन्ही आरोपींना यापूर्वीच कलम ३०२ अन्वये अटक केली गेली आहे आणि त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले आहे. आता पोस्टमॉर्टममध्ये बलात्काराची पुष्टी झाली आहे, तर आयपीसीच्या कलम ३७६-डी मध्येही खटला जोडला जाईल.

न्यूज अनकट प्रतिनिधी

error: Content is protected !!
Exit mobile version