यंदा शासकीय वाढदिवसावर कोरोनाचे सावट

१९८० च्या आधी जन्माला आलेल्या अनेकांची जन्म तारीख म्हणून शाळेच्या दाखल्यावर १ जूनची नोंद आहे. ज्यांचे जन्मदाखले उपलब्ध नव्हते. अशांची शाळेमध्ये १ जून ही जन्मतारीख नोंदवली गेली आहे. त्यामुळे या वाढदिवसाला सरकारी वाढदिवस असेही संबोधले जाते. अशा सरकारी वाढदिवसानिमित्त सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येतो. १ जून ही जन्मतारीख असलेल्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे दिवसभर सोशल मीडियावर वाढदिवस शुभेच्छांच्या व्यतिरिक्त फारसे काही अपलोड झालेले पाहायला मिळत नाही.

आपल्या लाडक्या नेत्याचा किंवा प्रियजनांच्या वाढदिवसाला हार-तुरे फेटे घेऊन जाणारे काही ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करणारे हौशी यांना मात्र कोरोना मुळे शांतच राहावे लागणार .

आज कोणाचा वाढदिवस आहे, हे सोशल मीडियातून तत्काळ समजत असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचे फॅड सध्या जोरात सुरू आहे. त्यामुळे स्मार्ट फोन मध्ये असणाऱ्या अॅप्सचा वापर करून वाढदिवस असणाऱ्या व्यक्तीचा फोटो ऍड करून किंवा वेगवेगळे कोलाज बनवून शुभेच्छा दिल्या जातात. राजकारणी लोकांच्या वाढदिवसाचे बॅनर कार्यकर्ते शहरभर लावतात. मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याचा वाढदिवस असेल, तर कोणी बॅनर लावत नाही व कोणी त्याला शुभेच्छाही देत नाही.

मात्र, सोशल मीडियावर अकाऊंट असणाऱ्या सर्व सामान्यांवर देखील वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा वर्षाव झालेला पाहायला मिळतो. त्यामुळे आपला देखील वाढदिवस साजरा केला जातो असा आनंद त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असतो. त्यामुळेच सोशल मीडियाचा वापर करणाऱ्यांमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसून येत आहे. १ जून जन्म तारीख असली तर ती खोटी असेल म्हणून त्याच्याकडे संशयाने पहिले जाते.

१९८० च्या अगोदर निरक्षरता जास्त होती. त्यावेळी बहुतांश पालकांना आपल्या पाल्याची जन्मतारीख माहीत नसायची परंतु साल माहित असायचे. गुरुजींनी शाळा प्रवेशाच्या वेळी संबंधित पालकांना पाल्याची जन्मतारीख विचारल्यावर मात्र हे पालक गोंधळायचे. निदान वर्ष माहित आहे का असे विचारल्यावर पालक वर्ष सांगत असत. मग त्याच वेळी गुरुजी आपल्या सोयी नुसार १ जून ही जन्म तारीख निश्चित करायचे. अशा पद्धतीने अनेकांच्या जन्मतारखांचा जन्म झालेला आहे. १९८० नंतर मात्र साक्षरता वाढत गेली आणि पालक जागरूक झाल्याने पाल्याची जन्मतारीख लिहून ठेवू लागले.

न्युज अनकट प्रतिनिधी: योगेश कणसे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा