चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार! ‘या’ देशांनाही धोका

नवी दिल्ली, २३ डिसेंबर २०२२ : कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा डोके वर काढले असून जगभराची चिंता वाढवली आहे. त्यामुळे सर्व देशांनी दक्षता घेण्यास सुरूवात केली आहे. भारतातही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सर्व राज्यांना पत्र लिहित कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

कोरोनाने चीन आणि अमेरिकेमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये सध्या कोरोना प्रादुर्भावाने मृत्यूचे तांडव सुरू झाले असून चीनपाठोपाठ आता अमेरिकेतही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.

चीन आणि अमेरिकेनंतर आता कोरोना विषाणूने जपानमध्ये कहर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, फ्रान्स आणि अमेरिकेत कोविडच्या वाढत्या प्रकरणांनी सरकारची चिंता वाढवली आहे. आकडेवारीचा अभ्यास करणार्‍या वर्ल्डोमीटर या वेबसाइटनुसार, काल जगात १३७४ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मोठी गोष्ट म्हणजे काल ज्या देशात सर्वाधिक मृत्यू झाले ते चीन किंवा अमेरिका नसून जपान आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कालच्या दिवशी, जपानमध्ये ३३९ लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अमेरिकेत २८९, ब्राझीलमध्ये १६५, फ्रान्समध्ये १२० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

  • कर्नाटकात मास्क सक्ती

गुरुवारी कर्नाटक सरकारने देखील राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाला मास्क घालणे बंधनकारक केले आहे. याबाबत माहिती देताना कर्नाटकचे आरोग्य मंत्री सुधाकर म्हणाले, कर्नाटकात चाचण्यांची संख्या वाढवली जाणार आहे. तसेच राज्यातील २० टक्के नागरिकांना तिसरा डोस मिळाला आहे. आता बूस्टर डोसची व्याप्ती ८० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची आमची योजना आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साई बाबा संस्थान, तसेच तुळजापुरच्या अंबाबाई मंदिरात मास्क सक्ती करण्यात आली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा