पुरंदर, दि. २ ऑगस्ट २०२०: कोरोना महामारीचा फटका राखी उद्योगालाही बसला आहे. कोरोनामुळे अनेक शहरे व बाजारपेठा बंद असल्यामुळे राखी खरेदीकडे लोकांनी पाठ फिरवल्याचे दिसते. त्यामुळे राखी उद्योगालासुद्धा कोरोनाचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. अनेक उत्पादकांच्या राख्या मागणी आभवी पडून आहेत.
बहिण आणि भावाच्या नात्याला उजाळा देणारा सण म्हणून रक्षाबंधनकडे पाहिले जाते. यावेळी बहिण भावाला राखी बांधते. त्यामुळे राखी पौर्णिमेच्या अगोदर महिन्याभरात राखीला मोठी मागणी असते. अनेक ठिकाणी घरीच राखी बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात केला जातो. देशात अनेक छोटे उद्योजक अगदी घरगुती पद्धतीने वर्षभर राख्या बनवत असतात. या राख्या रक्षाबंधनच्या दिवशी व त्याच्या आधी १५ दिवस अगोदर विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. यामधून या उद्योजकांना मोठे आर्थिक उत्पन्न मिळत असते. या उद्योगावर अनेक लोकांचे वार्षिक नियोजन असते. मात्र कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्यामुळे या उद्योगांच्या राख्या या तशाच पडून आहेत. त्याच बरोबर कोरोनामुळे लोकांना दुसऱ्या गावी जाण्याचे निर्बंध असल्याने यावर्षी अनेक बहीण भावाची भेट होऊ शकणार नाही. त्यामुळे या कुटीर उद्योजकांचे आर्थिक गणित कोलमडल्याचे दिसून येत आहे.
पुरंदर तालुक्यातील नीरा येथे सुद्धा अशा प्रकारच्या राख्या बनवण्याचा उद्योग आहे. वर्षभर घरातील लोक राबून राख्या बनवत असतात. गावागावांतील राखी विक्रेत्यांना त्यांची विक्री करत असतात. मात्र अनेक गावातून कोरोना रुग्ण तालुक्यात आढळल्याने तालुक्यातील अनेक गावातून कंटेनमेंट झोन असल्याने दुकाने बंद आहेत. त्यामुळे या राख्यांची मागणी घटली आहे. त्यांनी वर्षभर बनवलेल्या वेगवेगळ्या राख्या तशाच पडून आहेत. उद्या रक्षाबंधन असुनही मालाला उठाव नसल्याने त्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. हीच अवस्था देशातील बहुतेक राखी उत्पादकांची आहे. त्यामुळे आता अनेक राखी उत्पादकांच्या चेहऱ्यावरील हसू नष्ट झाले आहे.
“या वर्षीचा राखी उद्योग तोट्यात जाणार आहे. या वेळी राखीला मागणी अत्यंत कमी आहे. अनेक गावातील बाजार पेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनी माल उचलला नाही. त्यामुळे आता बनवलेला सगळा माल तसाच पडून रहाणार आहे. यातील बहुतेक राख्या वर्षभरात खराब होऊन जातात. किंवा त्या डिजाइन कालबाह्य होतात. त्यामुळे या वर्षी मोठा तोटा सहन करावा लागणार आहे.” – हसमुख पटेल (राखी उत्पादक)
न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे