मुंबईत ५३ पत्रकारांना कोरोनाची लागण

मुबंई : देशभर कोरोनाचा प्रसार वाढत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर आणि पोलीस हे आघाडीवर आहेत. त्याच बरोबर पत्रकारही प्रत्यक्ष फिल्डवर राहून घटनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आत्तापर्यंत डॉक्टर आणि पोलिसांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं होतं. आता पत्रकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुंबई महापालिका आणि टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन यांच्या वतीने पत्रकारांची काही दिवसांपूर्वी कोव्हीड १९ चाचणी घेण्यात आली. त्यात १६७ पत्रकारांची तपासणी करण्यात आली. यात पत्रकार, व्हिडीओ जर्नलिस्ट आणि फोटोग्राफर्स यांचा समावेश होता. त्यातल्या ५३ जणांना कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.

याचबरोबर पत्रकारांच्या कुटुंबीयांची देखील तपासणी केली जाणार आहे. तसेच हे पत्रकार ज्या इमारतींत राहतात त्या इमारतींमध्ये निर्जंतुकीकरण करून इमारती सील करण्याची कारवाई पालिकेच्या पथकांकडून सुरू करण्यात आली आहे. प्रतीक्षानगरमध्ये पत्रकारांचे वास्तव्य असलेली एक इमारत कंटेनमेंट एरिया म्हणून जाहीर करत आज दुपारनंतर सील करण्यात आली आहे. या इमारतीतील सर्व कुटुंबांना पुढील १४ दिवस होम क्वारंटाइन राहण्यास सांगण्यात आले आहे. काटेकोरपणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा